लव्ह स्टोरीचा 'सीक्रेट अँगल'? पाकिस्तानी महिला आणि चिनी नागरिकांची अवैध घुसखोरी, भारताच्या सुरक्षेला मोठा धोका
Illegal Intrusion of Citizens : पबजी गेममधून प्रेम जडलं आणि पाकिस्तानची महिला प्रेमीला भेटण्यासाठी थेट भारतात आली. हे प्रेमकहाणी बॉलिवूडप्रमाणे वाटत असली, तरी यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
PUBG Love Story : गेल्या काही दिवसांपासून एक पाकिस्तानी महिला आणि भारतीय नागरिक यांची प्रेमकहाणी जोरदार चर्चेत आहे. पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली. या दोघांच्या प्रेमकहाणीची बरीच चर्चा आहे. वर-वर पाहात ही एखादी बॉलिवूडची लव्ह स्टोरी वाटत असली तरी यामुळे देशाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीमा हैदर अवैधरित्या घुसखोरी करत भारतात आली, हे असं पहिलं प्रकरण नाही.
अवैध घुसखोरी गंभीर धोका
गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये नेपाळ सीमेतून अनेक पाकिस्तानी आणि चीनी नागरिक भारतात घुसखोरी करत असल्याचं दिसून आलं आहे. नेपाळमधून होणारी अवैध घुसखोरी राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका बनत आहे. नेपाळच्या खुल्या सीमेचा फायदा घेत पाकिस्तानी आणि चिनी नागरिक घुसखोरी करत आहेत. सीमा हैदरच्या आधी आणखी एक पाकिस्तानी महिला इकराही नेपाळमार्गे अवैधरित्या आली होती. अलीकडच्या काळात बेकायदेशीरपणे राहणारे अनेक चिनी नागरिकही पकडले गेले, तेही नेपाळमार्गेच भारतात आले होते.
PUBG ने प्रेमाची सुरुवात
सीमा आणि सचिन गेमिंग अॅप PUBG वर बोलू लागले आणि नंतर दोघांचं प्रेम जडलं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. यानंतर दोघांनी लग्नासाठी वकिलाशी चर्चा केली असता सीमाकडे व्हिसा नसून ती बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचं निष्पन्न झालं. वकिलाच्या तक्रारीवरून सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक करण्यात आली असून आता पाच दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही जामीन मिळाला.
नेपाळमार्गे पाकिस्तानी आणि चीनी नागरिकांची अवैध घुसखोरी
सीमा हैदर प्रमाणेच आणखी एक पाकिस्तानी महिला घुसखोरी करत भारतात आली. ऑनलाइन गेम खेळताना पाकिस्तानी महिला इकरा हिचं प्रयागराजमधील मुलायम सिंहवर प्रेम जडलं. यानंतर तिला भारतात यायचं होतं. त्यामुळे ती पासपोर्ट आणि व्हिजा नसल्यामुळे काठमांडूच्या सीमेवरून भारतात दाखल झाली. ती उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील मुलायम सिंहला भेटली आणि त्याच्यासोबत राहू लागली. 23 जानेवारी 2023 ला बंगळुरु पोलिसांनी इकरा आणि मुलायम सिंहला अटक केली. इकरा सप्टेंबर 2022 मध्ये अवैधरित्या भारतात आली. 19 वर्षीय इकरा आणि 26 वर्षीय मुलायम सिंह यांनी 2022 मध्येच लग्न केलं होतं. यानंतर 2023 मध्ये या प्रकरणातचा उलगडा झाली आणि पोलिसांनी कारवाई करच इकराला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलं. इतकंच नाही तर नोएडामध्ये पकडलेले दोन चिनी नागरिकही नेपाळमार्गे भारतात आले होते.
दोन चीनी नागरिकांची घुसखोरी
जून 2022 मध्ये भारत-नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बल (SSB) च्या जवानांनी दोन चिनी नागरिकांना संशयावरून अटक केली होती. हे दोन्ही तरुण 18 दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये व्हिसाशिवाय फिरत होते आणि याचा कुणाला सुगावाही लागला नाही. त्यांनी 24 मे 2022 रोजी नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश केला. दोघेही जवळपास 15 दिवस नोएडामध्ये त्यांच्या मित्रासोबत राहिले. लू लँग (30) आणि युन हेलांग (34) अशी या दोन चीनी नागरिकांची नावे आहेत. या दोन्ही नागरिकांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली आहे. दोघांकडे भारतीय व्हिसा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौकशीदरम्यान हे दोन्ही तरुण 23 मे रोजी थायलंडमार्गे काठमांडूला आल्याचं समोर आलं. त्यानंतर 24 मे रोजी तो कोरा मार्गे भारतात दाखल झाला.
लव्ह स्टोरीचा 'सीक्रेट अँगल'?
पाकिस्तान आणि चीनमधून अवैधरित्या भारतात येणाऱ्या लोकांसाठी नेपाळ सुरक्षित मार्ग बनत आहे. पाकिस्तानी सीमा हैदर गुलाम 27 वर्षीय महिला चार मुलांसह घुसखोरी करत भारतात पोहोचली. तिनं पाकिस्तानमधून नोएडा गाठलं. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तिने पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पण, ती अस्खलित इंग्रजी बोलते आणि संगणक चालविण्यातही एक्सपर्ट आहे. पोलीस सीमाची प्रेमकहाणी पूर्ण सत्य मानत नाहीत. तिचा मोबाईल जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणात पाकिस्तानी हेरगिरीच्या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत.