Saviours in Uniform : स्त्री शक्तीची 'किरण'
Independence Day 2022 : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतात. एक निडर आयपीएस अधिकारी म्हणून किरण बेदींनी आपली कारकीर्द गाजवली होती. त्याबद्दल आजही त्यांचं नाव अदबीनंच घेतलं जातं.
किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. किरण बेदींचे आई वडील प्रकाश लाल आणि प्रेमलता यांना शशी, किरण, रीटा, आणि अनू अशा चार मुली. चारही मुली अतिशय हुशार. त्यांचे आईवडील दोघेही पुरोगामी विचारांचे होते. ज्यामुळे मुलींना हुंड्यामुळे ओझे असे समजले जायचे त्यावेळी त्यांनी चारही मुलींना उच्च शिक्षण द्यायचे आणि त्यांना हवं ते करून देण्याचा निर्णय घेतला. ह्यासाठी त्यांना खूप अडथळ्यांचा सामान या करावा लागला. सर्व अडथळे पार करून त्यांनी चारही मुलींना उच्च शिक्षण दिले.
अमृतसरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन येथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर चंदिगड येथील पंजाब विद्यापिठातून सोशल सायंसमध्ये मास्टर्स पूर्ण केले. 1988 मध्ये दिल्ली विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर सोशल सायंसमध्ये डॉक्टरेट मिळवली. किरण बेदी यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेज फॉर वुमनमध्ये पॉलिटिकल सायंसच्या लेक्चरर म्हणून नोकरीला सुरवात केली. 1972 मध्ये त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतात. त्यांची पहिली नेमणूक चाणक्यपुरी उपविभागामध्ये अधिकारी म्हणून झाली. नवव्या आशियायी खेळ स्पर्धेदरम्यान त्यांची वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून नेमणून करण्यात आली. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने अनेक चुकीच्या जागी पार्किंग केलेल्या वाहनांना जप्त केले. या वेळी त्यांना 'क्रेन बेदी' असेही नाव देण्यात आले. पोलिस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी प्रधान संचालक हे पद भूषविले आहे. डिसेंबर 2007 मध्ये त्यांनी आयपीएसमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
पोलीस सेवेव्यतिरिक किरण बेदींनी समाजकार्यातही आपले नाव मिळवले. टि. व्ही. वरील आप कि कचेरी हा कार्यक्रम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला. त्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या हुंडाबळी, बलात्कार,घरगुती हिंसा, शोषण, अॅसिड हल्ले, सारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले. आपल्या समाजसेवेचा प्रवास असाच चालू ठेवण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी 2010 मध्ये आम आदमी पार्टी(AAP) मध्ये प्रवेश केला. नंतर 2015 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला
आपल्या कामातून किरण बेदींनी भारतीयांची मने जिंकून घेतली आहेत. तिहार जेल मधील कैद्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामगिरीबद्दल त्यांना मॅगसेसे पुरस्काराने 1994 साली गौरविण्यात आले. कुटुंबात पोलिसांची पार्श्वभूमी नाही. पण असे असूनही त्यांनी अनेक स्टिरिओटाइप तोडून करियरच्या या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. त्यांनी आपल्या कामाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. अशा या IPS अधिकाऱ्याला सलाम!