(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि संयुक्त समाज मोर्चा एकत्र निवडणूक लढवणार नाही, बलबीर सिंह राजेवाल यांची घोषणा
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि नव्याने निर्माण झालेली संयुक्त समाज मोर्चा (SSM) हे एकत्र निवडणुका लढवण्याची चर्चा सुरू होती. पण अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
Punjab Election 2022 : निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या निवडुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली करण्यास सुरूवात केली आहे. पंजाबमध्येसुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि नव्याने निर्माण झालेली संयुक्त समाज मोर्चा (SSM) हे एकत्र निवडणुका लढवण्याची चर्चा सुरू होती. पण अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. कारण संयुक्त समाज मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी आम आदमी पार्टीसोबत आमची युती होणार नाही अशी घोषणा केली आहे. एका आठवड्याच्या आत आम्ही पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर या आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकरी संघटनांनी मिळून संयुक्त समाज मोर्चाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, संयुक्त समाज मोर्चा आणि आम आदमी हे एकत्र निवडणुका लढवतील अशी चर्चा सुरू होती. मात्र संयुक्त समाज मोर्चा हा आम आदमी पक्षाबरोबर युती करणार नसल्याचे बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, युतीबाबत असे बोलले जात आहे की, जागा वाटपावरुन या दोन्ही पक्षामध्ये मतभिन्नता आहे. संयुक्त समाज मोर्चाला पंजाब विधनसभेच्या निवडणुकीत 60 जागा हव्या होत्या. मात्र, आम आदमी पार्टीने त्यांना केवळ 10 जागा देण्याचा प्रस्ताव दिला होती. त्यामुळे राजवेला यांनी आम आदमी पार्टीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे संयुक्त समाज मोर्चा आम आदमीबरोबर युती करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, दुसऱ्या कोणत्या पक्षाबरोबर जाणार का हे त्यांनी आणखी स्पष्ट केलेले नाही. योग्य वेळी निर्णय जाहीर करु असे राजेवाल यांनी सांगितले आहे.
संयुक्त समाज मोर्चाची स्थापना ही दिल्लीत शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या काही संघटनांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी 117 जागेवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील केली होती. मात्र, त्यानंतर आम आदमी पार्टीबरोबर युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या मुद्यावरुन पक्षात फूट पडल्याच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. त्यामुळे अखेर आम आदमी पक्षाबरोबर निवडणूक न लढवण्याचा निर्णय राजेवाल यांनी जाहीर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: