(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Azam Khan: ज्या खटल्यामुळे आमदारकी गेली, पोटनिवडणुकीत भाजप जिंकली; त्याच खटल्यात सपा नेते आझम खान निर्दोष
Azam Khan: समाजवादी पक्षाचे नेते आझन खान यांना ज्या खटल्यामुळे आपली आमदारकी गमवावी लागली. त्या प्रकरणात आता आझम खान हे निर्दोष सिद्ध झाले आहेत. मात्र, आझम खान यांच्या रामपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विजयी झाला आहे.
Samajwadi Party Azam Khan: समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूरचे माजी आमदार आझम खान यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टाने (Rampur MP-MLA Court) चिथावणीखोर भाषणाच्या खटल्यात आज निकाल सुनावला. या प्रकरणात कोर्टाने आझम खान यांना निर्दोष असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपने विजय मिळवला.
रामपूर विशेष कोर्टात बुधवारी, आझम खान यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली. बुधवारी कोर्टाने आझम खान यांना या प्रकरणात निर्दोष सिद्ध केले. याआधी रामपूरमधील कनिष्ठ न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. आता, एमपी-एमएलए कोर्टाने त्यांना निर्दोष सिद्ध केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने मागील वर्षी 27 ऑक्टोबर रोजी आपला निर्णय सुनावताना खान यांना दोषी ठरवले होते.
आझम खान यांच्या वकिलांनी काय म्हटले?
न्यायालयाच्या या निर्णयानंतर आझम खान यांचे वकील विनोद शर्मा म्हणाले, "आम्हाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. ज्या द्वेषपूर्ण, चिथावणी भाषणाच्या प्रकरणांमध्ये आम्हाला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या प्रकरणात न्यायालयाने आम्हाला निर्दोष जाहीर केले आहे. आमच्याविरोधात सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता आले नाहीत. आम्हाला खोट्या प्रकरणात फसवले होते. कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतले असल्याचे त्यांनी म्हटले.
गेल्या वर्षी या प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर सपाच्या नेत्याची आमदारकी रद्द करण्यात आली होती. यानंतर रामपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपने विजय मिळवला होता.
प्रकरण काय?
द्वेषपूर्ण, चिथावणीखोर भाषणाशी संबंधित असलेले हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. आझम खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभेत निवडणुकीच्या भाषणादरम्यान आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. भाजप नेते आणि रामपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आकाश सक्सेना यांनी ही तक्रार केली होती. या प्रकरणी रामपूर न्यायालयाने आझमला दोषी ठरवले.
गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. आझम खान हे भारतीय दंड विधान कलम 153ए, 505ए आणि 125 अंतर्गत दोषी आढळले. या शिक्षेच्या आधारे आझम खान यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर जामीन मिळाला असला तरी त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. यानंतर रामपूर जागेवर पोटनिवडणूक झाली, त्यात आकाश सक्सेना भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले.