राष्ट्रवादीला फुशारक्या मारण्याची सवय : सदाभाऊ खोत
400 खासदार असलेले पंतप्रधान मोदी कशाला चार खासदार असणाऱ्या पवारांचा सल्ला घेतील अशा शब्दात आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

पंढरपूर : राष्ट्रवादीला फुशारक्या मारण्याची सवय जास्त आहे. मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली की लगेच मोदी यांनी पवारांचा सल्ला घेतला अशा फुशारक्या मारल्या जातात. मात्र 400 खासदार असलेले पंतप्रधान मोदी कशाला चार खासदार असणाऱ्या पवारांचा सल्ला घेतील अशा शब्दात आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पंढरपूर मध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टोलेबाजी केली.
एका बाजूला पारंपरिक वारकरी संत असणाऱ्या बंडातात्या कराडकर याना जेलमध्ये टाकून मुख्यमंत्री कशाला लवाजमा घेऊन पंढरपूरला आषाढीसाठी येत आहेत असा सवाल करीत यांच्या घरी कोणती वारीची परंपरा आहे अशी शेरेबाजी केली . दोन डोस झाल्यानं परदेशी प्रवासाला जगभर परवानगी दिली जात असताना इथे आपल्याच देशात शेकडो वर्षाची परंपरा जपणाऱ्या वारकऱ्यांना दोन डोस झाल्यावर पंढरपूरला येऊ दिले जात नाही ही आघाडी सरकारची हुकूमशाही असून याला वारकरी योग्य भाषेत उत्तर देतील असा टोला लगावला.
राज्यात 55 साखर कारखान्यांच्या लिलावात 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असून यात शिखर बँकेपासून जिल्हा बँकेपर्यंत अनेकजण अडकले आहेत. याची सर्व कागदपत्रे केंद्रीय सहकारमंत्री अमितभाई शहा यांना देऊन चौकशीची मागणी केली जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. सहकारी कारखाने चालवणारे हे, ते बंद पडणारे हेच आणि त्यांचा लिलाव करणारे देखील हेच आहेत. लिलावात 50 आणि 60 कोटीची किंमत ठरवून घेणाऱ्या यांना परत शिखर बँक 300 आणि 400 कोटीची कर्जे कशी देतात असा सवाल करीत यांची सर्व कागदपत्रे केंद्राकडे दिली जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले. हे घशात घातलेले कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही लढाई लढत असून यात अनेक राजकीय नेते अडचणीत येतील असे खोत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :























