Bengaluru Garbage Tax: 1 एप्रिलपासून नागरिकांना भरावा लागणार कचरा कर, पालिकेच्या निर्णयाने नागरिकांमध्ये संताप
Garbage Tax in Bengaluru: शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय. 600 चौरस फुटांच्या घरासाठी महिन्याला 10 रुपयांपासून ते 4000 चौरस फुटांच्या घरासाठी महिन्याला 400 रुपयांचे शुल्क

बंगळुरु: देशातील आयटी उद्योग आणि रोजगाराचे प्रमुख केंद्र असलेल्या बंगळुरु शहरात सध्या एका नव्या वादावरुन वातावरण तापले आहे. नव्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून बंगळुरु महानगरपालिकेने रहिवाशांकडून कचरा कर (Garbage Tax fee) आकारायला सुरुवात केली आहे. या नव्या Garbage Tax fee मुळे बंगळुरुत (Bengaluru News) वादंग निर्माण झाला आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन सुविधेत सुधारणा करण्यासाठी बंगळुरु महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक घरात जाऊन गोळा केला जाणारा कचरा आणि कचऱ्याची विल्हेवाट यासह एकूण कचरा व्यवस्थापन प्रणालीत आमुलाग्र बदल करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र, रहिवाशांकडून या निर्णयाला कडाडून होणाऱ्या विरोधामुळे कचरा टॅक्स वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिकेने कचऱ्याचा वेगळा टॅक्स गोळा केला तरी त्यामुळे व्यवस्थेत खरंच सुधारणा होईल का आणि नंतरच्या काळात त्यामध्ये कितपत पारदर्शकता राहील, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. (Solid Waste Management in Bengaluru)
कर्नाटक सरकारने बंगळुरु महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन शुल्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पालिकेने हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला कर्नाटक सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. नागरिकांकडून कचरा व्यवस्थापन शुल्क वसूल केल्यास त्या माध्यमातून पालिकेला वर्षाला 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. कचऱ्यावर आकारल्या जाणाऱ्या या कराचे शुल्क प्रॉपर्टी टॅक्समध्ये समाविष्ट केले जाईल. त्यामुळे घराच्या आकारानुसार प्रॉपर्टी टॅक्समध्ये वाढ होईल. यामध्ये 600 चौरस फुटांच्या घरासाठी महिन्याला 10 रुपयांपासून ते 4000 चौरस फुटांच्या घरासाठी महिन्याला 400 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.
कचरा शुल्काचा काय परिणाम होणार?
या निर्णयामुळे बंगळुरुत ज्याठिकाणी मोठ्याप्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होते अशा व्यावसायिक आस्थापनांकडून पालिका एक किलो कचऱ्यामागे 12 रुपये इतके शुल्क आकारणार आहे. त्यामुळे कंपन्यांचा आणि रहिवाशी सोसायट्यांमध्ये दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. यावर नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही कचऱ्यासाठी शुल्क भरायला तयार आहोत पण मग आम्हाला संपूर्ण बंगळुरु शहर साफ झालेले हवे. कचऱ्याच्या शुल्कातून येणारा 600 कोटी रुपयांचा निधी पारदर्शीपणे वापरला जावा आणि त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ नये, ही आमची मागणी आहे. या निधीचा गैरवापर झाला तर गरुड पुराणात त्यासाठी वेगळी जागा आहे, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
आणखी वाचा























