Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या सोहळ्यापासून दूर राहणार 'सीताराम'; सीपीएमने सांगितले 'हे' कारण!
Ram Mandir Inauguration : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण आल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब असून राजकीय फायद्यासाठी ते साधन होता कामा नये अशी भूमिका माकपने घेतली आहे.
Ram Mandir CPM : अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचे लोकार्पण (Ram Mandir Inauguration) पुढील महिन्यात पार पडणार आहे. हा लोकार्पण सोहळा भव्य होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही देण्यात आले आहे. भारतातील मोठा डावा पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालादेखील (CPIM) राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, पक्षाने धर्म ही वैयक्तिक बाब असल्याचे म्हटले आहे. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब असून राजकीय फायद्यासाठी ते साधन होता कामा नये अशी भूमिका माकपने घेतली आहे. याच कारणास्तव पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी (Sitaram Yechury) कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे पक्षाने आता स्पष्ट केले आहे.
पॉलिट ब्युरोच्या बैठकीत काय निर्णय?
मंगळवारी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत राम मंदिर ट्र्स्टकडून आलेल्या आमंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यानंतर पक्षाने ट्वीटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीपीएमने म्हटले की, धार्मिक श्रद्धेचा आदर करणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या श्रद्धेचे पालन करण्याचा अधिकार हे आमचे धोरण आहे. धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे, ज्याचे राजकीय फायद्याचे साधन बनू नये. निमंत्रण मिळूनही कॉम्रेड सीताराम येचुरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. कॉम्रेड येचुरी यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
CPI(M) believes that religion is a personal choice not to be converted into an instrument for political gain. Therefore, we will not be attending the inauguration of the Ram temple in Ayodhya. pic.twitter.com/glF4gluMzi
— CPI (M) (@cpimspeak) December 26, 2023
धर्माबद्दल सीपीएमचे धोरण काय?
पक्षाने म्हटले आहे की, "सीपीएमचे धोरण धार्मिक श्रद्धांचा आदर करणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या विश्वासाचे पालन करण्याच्या अधिकाराचे रक्षण करणे हे आहे. धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे, ज्याचा राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर होता कामा नये असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
भाजप-संघावर टीका
सीपीएमने आपल्या निवेदनात म्हटले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ने एका धार्मिक कार्यक्रमाचे रुपांतर हे सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमात केले आहे. ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. सीपीएम धार्मिक आस्था, श्रद्धांचा आदर करते मात्र त्याच्या राजकीयकरणाचा विरोध करत असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
सीपीएम पॉलिट ब्युरोच्या नेत्या वृंदा करात यांनी म्हटले की, आम्ही धार्मिक श्रद्धांचा आदर करत असलो तरी एका धार्मिक कार्यक्रमाला राजकारणाशी जोडले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. धार्मिक समारंभाचे राजकारण करणे योग्य नाही असे त्यांनी म्हटले.