Sansad TV | राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीच्या एकत्रिकरणातून आता 'संसद टीव्ही'
राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीच्या एकत्रिकरणासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनंतर या दोन्ही टीव्हींचे एकत्रिकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या अख्यत्यारीत येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा टीव्हींचे एकत्रिकरण करण्यात आलं आहे. या दोन्ही टीव्हींच्या एकत्रिकरणातून आता 'संसद टीव्ही' या नावाने नवीन चॅनेल सुरु करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी एक समिती नेमली होती. या समितीने या दोन्ही टीव्हींचे एकत्रिकरण करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आता या दोन्ही टीव्हींचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन चॅनेलचे नाव आता संसद टीव्ही असं करण्यात आलं आहे.
या नव्या संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रिटायर्ड आयएएस रवी कपूर यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या संबंधी गेल्या वर्षीच सूचना देण्यात आल्या होत्या पण सोमवारी राज्यसभा सचिवालयाने याची अधिकृत घोषणा केली.
या संसद टीव्हीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदनातील लाईव्ह कामकाज पाहता येणार आहे. लोकसभा टीव्हीवर हिंदीत तर राज्यसभा टीव्हीवर इंग्रजीत प्रसारण करण्यात येईल. या आधी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही टीव्हींचे कामकाज पूर्णपणे वेगळं होतं. लोकसभा टीव्हीचे कामकाज हे लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनाखाली तर राज्यसभा टीव्हीचे कामकाज हे राज्यसभा सभापतींच्या मार्गदर्शनाखाली सुरु असायचं. आता या दोन टीव्हींचे एकत्रिकरण झाल्याने एकाच प्रशासनाच्या वतीने संसद टीव्हीचे कामकाज सुरु राहणार आहे.
'हम दो हमारे दो'चं सरकार; कृषी कायद्यांवर बोलताना राहुल गांधींचा सरकारवर निशाणा