(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चीनसोबत तणाव सुरु असतानाच, सीमेवर सैन्याच्या हालचालीसाठी 43 पूल तयार
देशाच्या सीमेलगतच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बीआरओने बांधलेल्या 4३ पुलांचं आज संरक्षणमंत्री उद्घाटन करणार आहेत.काही दिवसांपासून सीमेवर चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. अशातच भारतीय सैन्याच्या हालचालीसाठी या पुलांची फारच आवश्यकता होती.
नवी दिल्ली : देशाच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. देशाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह देशाच्या सीमेलगतच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 43 पुलांचं ई-उद्घाटन करणार आहेत. हे सर्व पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओने बांधले आहेत. यासोबत 6 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहतांग टनेलचं उद्घाटन करणार आहेत.
'या' ठिकाणी पुलांची निर्मिती संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बीआरओने बनवलेल्या 43 पैकी 10 पूल जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. सात पूल लडाख, दोन पूल हिमाचल प्रदेश, चार पूल पंजाब, आठ पूल उत्तराखंड, आठ पूल अरुणाचल प्रदेश आणि चार पूर सिक्कीममध्ये आहेत. या सर्व पुलांचं उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. यावेळी हिमाचल प्रदेश, पंजाब, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाखचे उपराज्यपालही उपस्थित असतील. यासबोतच बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांचीही हजेरी असेल.
43 पैकी 22 पूल एकट्या भारत-चीन सीमेवर देशातील विविध राज्यांना लागून असलेल्या सीमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेल्या पुलांचं एकाच वेळी उद्घाटन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु असतानाच बीआरओने दिवस-रात्र एक करुन सीमांवरील नदी-नाल्यांवर पूल बांधले आहेत. 42 पैकी 22 पूल एकट्या चीन सीमेवर आहेत. यापैकी एक पूल हिमाचल प्रदेशच्या दारचामध्ये तयार केला असून त्याची लांबी सुमारे 350 मीटर आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या पुलांसह राजनाथ सिंह यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगसाठी असलेल्या निचिफू टनेलचं भूमिपूजन करतील. या टनेलची निर्मितीही बीआरओ करत आहे. या टनेलचं बांधकाम पूर्ण झाल्यावर एलएसीवरील महत्त्वाच्या असलेल्या तवांगपर्यंतचा प्रवास सोपा होईल आणि वेळेचीही बचत होईल.
6 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी रोहतांग टनेलचं उद्घाटन करणार दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ऑक्टोबर रोजी सामरिक महत्त्व असलेल्या रोहतांग टनेलचं (अटल टनेल) उद्घाटन करणार आहेत. हिमाचल प्रदेशातील रोहतांग टनेलचं काम मागील दहा वर्षांपासून काम सुरु होतं. या टनेलमुळे कुलू मनालीहून दारचा मार्गे लडाखची सप्लाय लाईन बाराही माहिने खुली राहिल. कारण हिवाळ्यात रोहतांगमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होऊन रस्ता बंद होतो.
साडेचार महिन्यांपासून पूर्व लडाखजवळ एलएसीवर भारत-चीनमध्ये तणाव मागील साडेचार महिन्यांपूर्वी पूर्व लडाखजवळ एलएसीवर भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु आहे. अशा परिस्थितीत रोहतांग टनेलद्वारे सैन्याची सप्लाय लाईन पूर्व लडाखद्वारे खुली राहिल. पूर्व लडाखशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवरही चीन सैन्याच्या हालचाली काही दिवसांपासून वाढल्या आहेत. अशातच भारतीय सैन्याच्या हालचालीसाठी या पुलांची फारच आवश्यकता होती