जयपूरमध्ये शासकीय रुग्णालयात डॉक्टरची रुग्णाला बेडवर चढून मारहाण
मारहाण झालेल्या रुग्णाची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना जून महिन्यातील असून गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जयपूर : राजस्थानमधील जयपूरच्या सवाई मानसिंह शासकीय रुग्णालयात एका डॉक्टरनेच रुग्णाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थान मानवाधिकार आयोगाने रुग्णालय प्रशासनाला 25 जूनपर्यंत संबंधित घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुबारिक नावाचा रुग्ण पोटदुखीच्या कारणामुळे 1 जूनला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्यावेळी तपासणीसाठी आलेल्या महिला डॉक्टरसोबत त्याने गैरवर्तन केलं. याची माहिती मिळताच रुग्णालयातील डॉक्टरने अगदी बेडवर चढून त्याला मारहाण केली.
मारहाण झालेल्या रुग्णाची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना जून महिन्यातील असून गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडीयो एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे. रुग्णालयातील अनुशासन समिती याप्रकरणाची चौकशी करणार आहे आणि त्याबाबतचा अहवाल राजस्थान मानवाधिकार आयोगाला सादर करणार आहे, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. डी एस मीणा यांनी सांगितलं.