(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी खेद व्यक्त केला होता, बृजभूषण यांच्यासमोर साध्वी कांचनगिरी यांचा दावा
"राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाविषयी खेद व्यक्त केला होता," असा दावा साध्वी कांचनगिरी यांनी केला आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच "राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाविषयी खेद व्यक्त केला होता," असा दावा साध्वी कांचनगिरी यांनी केला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत दाखल झालेल्या साध्वी कांचनगिरी यांनी हा दावा केला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी परप्रांतियांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पश्चाताप होतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. तर काल (17 मे) त्यांच्या पत्रकार परिषदेत पोहोचलेल्या साध्वी कांचनगिरी यांनी राज ठाकरेंनी खेद व्यक्त केल्याचं सांगत त्यांना आपण माफ केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान साध्वी कांचनगिरी यांच्या या दाव्यावर मनसेचे भूमिकेची प्रतीक्षा आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं : गुरु माँ कांचनगिरी
पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी काय म्हणाल्या?
"चार महिन्यांपूर्वी मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यांनी मला बोलावलं आणि मानसन्मान दिला. मी त्यांना विचारलं की तुम्ही जे उत्तर भारतीयांसोबत केलं ते योग्य होतं का? त्यावर ते म्हणाले की माताजी आमची चूक झाली आहे. मी व्हिडीओ दाखवते. पत्रकार परिषद होती, तिथे सगळे पत्रकार उपस्थित होते. जर त्यांनी एका संताची माफी मागितली आहे. तर मी पण म्हणते की आपण त्यांना माफ करा आणि तुम्ही तिथे स्टेज तयार करा. माझं काम असेल ते येऊन आपली माफी मागतील आणि आपली चूक कबूल करतील," असं साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान खासदार बृजभूषण यांना सांगितलं.
बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध कायम
राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध अजूनही कायम आहे. राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध कायम असल्याचं सांगितलं. उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत राज ठाकरे यांना भेटू नका, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्वीट करु केलं. तसंच अयोध्या सगळ्यांची आहे, उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्या आल्यास त्यांना रोखणार. त्यांना अयोध्याच काय उत्तर प्रदेशच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, असं बृजभूषण सिंह म्हणाले. राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ला खासदार बृजभूषण यांना 'आण रे तो पीडित' असं म्हणत 2008 साली मनसेने मारहाण केलेल्या उत्तर भारतीयांनाच पत्रकार परिषदेत उभं केलं.