(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vande Bharat Express: 'वंदे भारत एक्स्प्रेस'वर दगडफेक; लाखोंचे नुकसान, 151 जणांना अटक
Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीमुळे रेल्वेचे लाखोंचे नुकसान सहन करावे लागले.
Vande Bharat Express: देशभरात एकामागून एक वंदे भारत एक्स्प्रेस नवीन मार्गांवर सुरू होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) बहुतांशी मार्गांवर प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस वेग पकडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी या गाडीवर दगडफेकीच्या (Stone Pelting on Vande Bharat Express) घटना घडल्या आहेत. बिहार, पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागांत गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेचे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली.
2019 पासून, वंदे भारत गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेचे 55 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, दगडफेकीच्या घटनांमध्ये 151 जणांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी किंवा कोणत्याही प्रवाशाचे सामान चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची घटना घडलेली नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
रेल्वेमंत्री म्हणाले, “वंदे भारत गाड्यांवर दगडफेकीच्या काही घटना समोर आल्या आहेत. 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 (जून पर्यंत) या वर्षांमध्ये भारतीय रेल्वेला 55.60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये वंदे भारत गाड्यांचे नुकसान झाले आहे. वैष्णव म्हणाले की, प्रवाशांच्या आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) जिल्हा पोलिस आणि प्रशासनासह 'ऑपरेशन साथी' राबवत आहे.
'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या रंगात बदल
'वंदे भारत एक्स्प्रेस' ही आता पांढऱ्या ऐवजी नारंगी आणि राखाडी रंगामध्ये दिसणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रंगातील वंदे भारतचे फोटो शेअर केले होते. वंदे भारतच्या आधीच्या रंगापेक्षा आताचा अधिक आकर्षक असल्याचं म्हटलं जात आहे. देशभरात सध्या 25 वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग किती?
वंदे भारत गाड्या सरासरी 64 किमी प्रतितास ते 95 किमी प्रतितास या वेगाने धावतात. दहा पैकी आठ व्हीबी ट्रेनचा वेग 80 किमी प्रतितास पेक्षा कमी आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल व्यावसायिक वेग160 किमी/तास (९९ मैल प्रति तास) आहे. चाचणी दरम्यान या एक्स्प्रेसने 180 किमी/तास (११० मैल प्रतितास) इतका वेग गाठला आहे. रेल्वे ट्रॅक वेग क्षमता आणि रहदारीच्या मर्यादांमुळे, वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगावर मर्यादा आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (RDSO) द्वारे डिझाइन केले होते. चेन्नई येथील सरकारच्या मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) या एक्स्प्रेसची बांधणी करण्यात येते. 16 डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची किंमत सुमारे 115 कोटी रुपये आहे.