अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र
Rahul Gandhi letter : लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाही शासन व्यवस्थेत स्थान नाही हे पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
Rahul Gandhi letter to Farmers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली. येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून याबाबतची संसदीय प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना जाहीर पत्र लिहून अभिनंदन केले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केल्याने जवळपास वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस अशा अडचणी, संकटाना गेल्या जवळपास पावणे बारा महिने तोंड देत तिन्ही शेतीविरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी तुम्ही जो सत्याग्रह जिंकलात, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासात सापडत नाही. तुमच्या या लढ्यात 700 हून अधिक शेतकरी-मजूर बंधू-भगिनींनी दिलेल्या बलिदानाला मी नमन करत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
ज्या गांधीवादी पद्धतीने तुम्ही हुकूमशहा शासकाच्या अहंकाराशी लढताना त्यांना निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. ते सत्याचा असत्यावर असलेल्या एका विजयाचे अनोखे उदाहरण आहे. त्यांनी पुढे लिहिले की, या ऐतिहासिक दिवशी आम्ही त्या शहीद शेतकरी-मजूर बंधू-भगिनींचे स्मरण करतो, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या सत्याग्रहाला बळ दिले. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच लक्ष दिले असते तर हे घडले नसते, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
संघर्ष अजून संपला नाही
संघर्ष अजून संपला नसल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले. शेतमाला हमीभाव, वादग्रस्त वीज कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करणे, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरील कराचा बोझा कमी करणे, डिझेलच्या किंमतीमधील अप्रत्यक्ष दर वाढ कमी करा, शेतमजूरांवरील कर्जाचे ओझे कमी करणे आदी मुद्दे आहेत.
राहुल गांधी यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना आपला नफा-तोटा चांगल्याप्रकारे समजतो. काही मूठभर भांडवलदारांच्या हातातले बाहुले बनून शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतीत गुलाम करण्याचा कट रचण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये असा इशाराही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दिला.
पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनानुसार, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भविष्यातील योजनांचे रोडमॅप तयार करावे. सत्ता सेवेचे माध्यम आहे. लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाही शासन व्यवस्थेत स्थान नाही हे पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha