RSS शाखेत जाणारे गांधी नाही, तर गोडसेच्या मार्गाने जातात; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
Rahul Gandhi on PM Modi : आरएसएस शाखांवर जाणाऱ्यांना गांधी समजणं अशक्य, RSS शाखेत जाणारे गांधी नाही, तर गोडसेच्या मार्गाने जातात, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर घणाघात केला आहे.
PM Modi Mahatma Gandhi Remarks: मुंबई : शाखेत जाणाऱ्यांना गांधी समजणंच शक्य नाही, ते गोडसेच्याच मार्गानं जातात, असा पलटवार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट समाचार घेतला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यावरून सध्या वादंग सुरू झाला आहे. गांधी सिनेमामुळे जगाला गांधी समजले, हा दावा मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदींनी (PM Modi) केला होता. मोदींच्या याच वक्तव्यावर आगपाखड करत राहुल गांधींनी जोरदार पलटवार केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावरून निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी तिखट झाल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (28 मे 2024) एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 मधील गांधी चित्रपट तयार होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत बोलताना केला होता. मोदींच्या याच वक्तव्यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ज्यांचा दृष्टिकोन शाखांवर आधारित आहे ते गांधी समजू शकत नाहीत : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (29 मे 2024) दिवसभरात पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर निशाणा साधल्यानंतर फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून पुन्हा प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी म्हणाले की, "ज्यांच्या जगाचा दृष्टिकोन शाखांमध्ये तयार होतो, ते गांधीजींना समजू शकत नाहीत. असे लोक गोडसेला समजतात... गोडसेच्या मार्गावर चालतात. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते."
राहुल गांधी म्हणाले की, "मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन, हे सर्व लोक महात्मा गांधींपासून प्रेरित आहेत. भारतातील कोट्यवधी लोक महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबतात. ही लढाई सत्य आणि अहिंसेसाठी आहे... ती हिंसा आणि अहिंसेवर आहे... जे लोक हिंसा करतात त्यांना सत्य समजू शकत नाही."
महात्मा गांधींनी जगाला अंधाराशी लढण्याचं बळ दिलंय
राहुल गांधींनी व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "महात्मा गांधी हे सूर्य आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. सत्य आणि अहिंसेच्या रूपात बापूंनी जगाला असा मार्ग दाखवला, जो अन्यायापासून दुर्बलांचंही रक्षण करू शकेल." हे त्यांना सरकारच्या विरोधात उभे राहण्याचे धैर्य देते आणि त्यांना शिक्षणाच्या कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.