Rahul Gandhi : राहुल गांधींनी काल सरकारी बंगला सोडला, आजपासून दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर; विजयपुरामध्ये रोड शो करणार
Rahul Gandhi Road Show : राहुल गांधी विजयपुरा येथे संध्याकाळी 5 ते साडे सहा या वेळेमध्ये रोड शो करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आठवडाभरातील राहुल यांचा हा दुसरा कर्नाटक दौरा आहे.
Rahul Gandhi Road Show : काँग्रेस नेते राहुल गांधी आज रविवारी (23 एप्रिल) दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर पोहोचणार आहेत. राहुल आज बागलकोट जिल्ह्यात बसव जयंती सोहळ्यात सहभागी होतील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी लिंगायत समाजाला प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. राहुल विजयपुरा येथे संध्याकाळी 5 ते साडे सहा या वेळेमध्ये रोड शो करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आठवडाभरातील राहुल यांचा हा दुसरा कर्नाटक दौरा आहे. यापूर्वी, राहुल गांधी 16 एप्रिल रोजी 'जय भारत' रॅलीसाठी कर्नाटकात गेले होते. कोलारमध्ये ही रॅली त्यांनी घेतली होती. यावेळी राहुल यांनी प्रश्न विचारल्याने माझी खासदारकी हिसकावून घेतल्याचे म्हटले होते. पण मी अजूनही पीएम मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध? हे विचारत असल्याचे म्हणाले होते.
राहुल गांधी आज सकाळी साडे दहा वाजता हुबळीमध्ये पोहोचतील. येथून ते हेलिकॉप्टरने बागलकोट येथील कुडाळ संगम येथे जातील. कुडाळ संगम हे लिंगायत पंथाचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जे कर्नाटकातील प्रभावशाली समुदायांपैकी एक आहे. येथे राहुल गांधी बसव मंटपाच्या उत्सव समितीने आयोजित केलेल्या बसव जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस नेते संगमनाथ मंदिर आणि एक्य लिंगाला भेट देणार आहेत. राहुल गांधी संध्याकाळी विजयपुराला रवाना होतील. येथे ते सायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेत रोड शो करणार आहेत. ते विजयपुरा येथील शिवाजी सर्कल येथे सभेला संबोधित करतील. उद्या बेळगाव येथील रामदुर्ग येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
राहुल यांची कर्नाटकच्या जनतेला 5 आश्वासने
राहुल गांधी 16 एप्रिल रोजी कोलार येथील जाहीर सभेत पाच आश्वासने दिली होती. प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज, महिलांना दरमहा 2000 रुपये, युवा निधी 3000 हजार रुपये कर्नाटकातील प्रत्येक पदवीधरांना 2 वर्षांसाठी दिले जातील. तसेच प्रत्येक डिप्लोमाधारकाला 1500 रुपये अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. सरकार स्थापन होताच पहिल्या सभेत ही आश्वासने पूर्ण केली जातील, अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे.
तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडला
दरम्यान, सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी राजधानी दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडला. हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचं दिसून आलं. सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, 19 वर्षांनंतर मी घर सोडत आहे. हे घर देशातील जनतेचे आहे, मी आता 10 जनपथवर राहणार आहे. त्यांनी लोकसभा सचिवालयाला बंगल्याच्या चाव्या सुपूर्द केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या