Rahul Gandhi : आसाममध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'विरोधात तक्रार दाखल, मार्गात बदल केल्यामुळे आसाम पोलिसांची कारवाई
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रे सध्या आसाममध्ये आहे. इथे पोलिसांनी या यात्रेच्या विरोधात तक्रार दाखल केलीये.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या (Bharat Jodo Nyay Yatra) विरोधात गुरुवार 18 जानेवारी रोजी आसाम (Aasam) पोलिसांनी तक्रार दाखल केलीये. पीटीआयने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान या यात्रेच्या मार्गात बदल केल्याने पोलिसांनी ही तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे. याच मार्गासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील इशारा दिला होता.
राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याय यात्रा शहरांमधून काढण्यात आली. यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा देत म्हटलं होतं की, शहरांच्या मध्यभागातून मार्ग काढू नका. तुम्ही जो पर्यायी मार्ग मागाल त्याला परवानगी दिली जाईल. पण जर शहरांच्या मधून जर यात्रा काढण्याचा हट्ट धरण्यात आला तर पोलिसांची फौज देखील तयार असेल.
भारत जोडो न्याय यात्रेचा टप्पा आसाममध्ये
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही यात्रा आता नागालँडमधून आसाममध्ये पोहचलीये. याच वेळी राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री हे या राज्यांत आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?
काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत या संदर्भात भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, जेवढं प्रेम आम्हाला मणिपूर आणि नागालँडच्या लोकांकडून मिळालं. आमच्या या यात्रेचा मुख्य उद्देश हा तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न आणि तुमच्यावर होत असलेल्या अन्याय जवळून समजावून घेण्यासाठी आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, आसाम सरकार हे भाजपच्या रूपाने द्वेषाच्या खतातून जन्माला आलेले भ्रष्टाचाराचे पीक आहे. आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे काम केवळ द्वेषाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणे आहे. पैशाची ताकद आसामच्या लोकांच्या शक्तीला कधीही पराभूत करू शकत नाही. आपल्याला या अन्यायाविरुद्ध लढायचे आहे आणि असा आसाम निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक हाताला रोजगार आहे आणि ज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव नेहमीच समृद्ध राहते.