(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Corona Positive: राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीट करुन दिली माहिती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, सौम्य लक्षणं दिसल्यानंतर माझी कोरोना टेस्ट झाली, माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
राहुल गांधी यांनी कोरोनो विषाणूची लागण झाल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, आम्ही सर्वजण आपण त्वरित बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. या संकटाच्या वेळी देशाला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तुम्ही लवकरच बरे व्हाल. देश आपल्या जननेत्याची वाट पाहत आहे. ''
युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही.ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा संपूर्ण भारत कोरोनाच्या तावडीत सापडला आहे, तेव्हा कोणीही त्यापासून अबाधित राहू शकत नाही, तुम्ही नेहमी योद्धयासारख्या प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आहे, माझा विश्वास आहे, की तुम्ही लवकरच कोरोनावरही मात कराल, IYC चे लाखो कार्यकर्त्यांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. लवकर बरे व्हा भैया.''
राजधानी दिल्लीत कोरोनाची नवीन प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोमवारी, 23,686 लोकांना कोरोना संसर्ग झाला आणि 240 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचाही कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द
कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच पश्चिम बंगालमधील त्यांच्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर इतर नेत्यांनाही मोठ्या जाहीर सभांच्या परिणामांबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, "कोविडची परिस्थिती पाहता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व जाहीर सभा रद्द करत आहे. सद्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जनसभा घेण्याचे काय परिणाम आहेत याचा सखोल विचार करण्याचा मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देईन."