'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात माफी
राफेल फेरविचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने काही महत्वाचे दस्तावेज गहाळ झाली आणि ही गहाळ झालेली कागदपत्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होत असल्याचा दावा केला होता. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर होत असलेले दस्तावेज कोर्टाच्या सुनावणीत ग्राह्य धरण्याजोगा नाही, असा दावाही सरकारच्या वतीने केला गेला.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र देऊन राफेल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाच्या एका निर्देशाचा अन्वयार्थ चुकीच्या पद्धतीने लावला, याबाबत खेद व्यक्त केला होता. त्यावेळी त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काहीही मत व्यक्त न करता त्या प्रतिज्ञापत्रावर आज सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.
त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत राहुल गांधी यांचे वकील वारंवार खेद व्यक्त करणं कसं योग्य आहे, हे कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कोर्टाचा रागरंग पाहून त्यांनी रितसर माफीनामा सादर केला.
राफेल फेरविचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने काही महत्वाचे दस्तावेज गहाळ झाली आणि ही गहाळ झालेली कागदपत्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होत असल्याचा दावा केला होता. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर होत असलेले दस्तावेज कोर्टाच्या सुनावणीत ग्राह्य धरण्याजोगा नाही, असा दावाही सरकारच्या वतीने केला गेला.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने 10 एप्रिल रोजीच्या सुनावणीत सरकारचा हा युक्तीवाद खोडून काढला, त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या वतीने दिली जात असलेली 'चौकीदार चोर है' ही घोषणा सुप्रीम कोर्टानेही मान्य केली असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायलायही आपल्या मताशी सहमत असल्याचा दावा केला होता.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या प्रतिक्रियेला सत्ताधारी भाजपकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. कोर्टाच्या कोणत्याही निर्देशाचा चुकीचा अन्वयार्थ लावणं किंवा जो तपशील निकालपत्रात नाही तो निकालपत्रात असल्याचा दावा करणं, हा न्यायालयाचा अवमान असल्याची भूमिका भाजपने घेतली. भाजप नेत्यांनी फक्त ही भूमिका जाहीरच केली नाही, तर भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानना याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला या अवमान याचिकेवर सुनावणी करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना स्पष्टीकरण देण्यासाठी सांगण्यात आलं. त्यावेळी राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की, राहुल गांधी राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीपणीवर प्रतिक्रिया देताना जोशात बोलून गेले. कोर्टाचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. तसेच राहुल गांधी यांच्यावतीने दाखल लेखी जबाबात त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी खेदही व्यक्त केल्याचं सांगितलं. त्यावर मीनाक्षी लेखी यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी जोरदार हरकत घेतली. राहुल गांधी आपल्या प्रतिक्रियेसाठी आग्रही आहेत, ते माफी मागायला तयार नाहीत, असा दावा त्यांनी कोर्टात केला होता.
त्यावेळी न्यायालयाने अवमान याचिकेसाठी राहुल गांधी यांना रितसर नोटीसही बजावली. त्यानंतर आज अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासाठी रितसर माफी मागितली. कोर्टाच्या निर्देशाचा चुकीचा अर्थ लावण्यासाठी आणि कोर्टाच्या तोंडी आपल्या पक्षाची राजकीय घोषणा घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली.
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आज झालेल्या सुनावणीत, अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्यावतीने मागितलेल्या बिनशर्त माफीबाबत काही लेखी दस्तावेज आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा सिंघवी यांनी पुढील सोमवारी लेखी माफीनामा सादर करण्याचं आश्वासन न्यायालयाला दिलं.