Rafale Fighter Jet | भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार, राफेल विमानं ताफ्यात सामील होणार!
भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा आज अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील.
अंबाला : भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा आज अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. एका सोहळ्यात राफेल विमानांचा अंबाला एअर बेसमध्ये समावेश होईल. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. ही विमानं हवाई दलाच्या सतराव्या स्क्वॉड्रन, 'गोल्डन एअरो'चा भाग असतील. पाच राफेल विमानांची पहिली खेप 27 जुलै रोजी फ्रान्सहून अंबाला इथल्या हवाई दलाच्या एअर बेसवर पोहोचली होती. कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार? सीडीएस जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांच्यासह संरक्षण मंत्रालय आणइ सशस्त्र दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित असतील. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नोंद होणाऱ्या या मोठ्या घटनेचे ते साक्षीदार असतील.
या निमित्ताने भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन, हवाई दल प्रमुख एरिक ऑटेलेट, फ्रान्सच्या हवाई दलाचे उपप्रमुख आणि अन्य अधिकारी फ्रान्सच्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करतील.
फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांना सलामी देणार दसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आणि एमबीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक बेरांगर यांच्या फ्रान्सच्या संरक्षण उद्योगातील अनेक अधिकाऱ्यांचं एक मोठं शिष्टमंडळही या सोहळ्याला उपस्थित असेल. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली दिल्लीत येताच त्यांचा सन्मान म्हणून सलामी दिली जाईल.
राफेल विमानांची प्रात्यक्षिके, वॉटर कॅननची सलामी अंबाला एअर बेसमध्ये विधीवत आणि पूजा-अर्चा करुन राफेल विमानांचं औपचारिक अनावरण केलं जाईल. या निमित्ताने राफेल विमानं प्रात्यक्षिकं दाखवतील, ज्यात तेजस विमानांसह सारंग एअरोबेटिक टीमचाही समावेश असेल. यानंतर राफेल विमानांना पारंपरिक पद्धतीने वॉटर कॅननची सलामी दिली जाईल. या सोहळ्याचा समारोप हवाई दलाच्या 17व्या स्क्वॉड्रनमध्ये राफेल विमानं विधीवत सामील केल्यानंतर होईल. यानंतर भारत आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाची द्विपक्षीय बैठक पार पडे.
2021 पर्यंत भारताला सर्व 36 राफेल विमानं मिळणार भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल लढाऊ विमानांचा करार झाला आहे. या विमानांसाठी 59,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कराराच्या चार वर्षांनी म्हणजेच 29 जुलै 2020 रोजी पाच राफेल लढाऊ विमानांची फेरी भारतात पोहोचली होती. फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने ही विमानं बनवली आहेत. मात्र अजून ही विमानं हवाई दलात औपचारिकदृष्ट्या सामील झालेली नाहीत. आतापर्यंत भारताला 10 राफेल विमानं मिळाली आहे, ज्यापैकी पाच विमानं सध्या फ्रान्समध्ये असून भारतीय हवाई दलाचे वैमानिक त्यांचं प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान सर्व 36 लढाऊ विमानं 2021 च्या अखेरपर्यंत भारताला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज राफेल विमान चार राफेल लढाऊ विमानांची आणखी एक खेप नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. रशियाकडून सुखोई विमानांच्या खरेदीनंतर, अचूक मारक क्षमतेसाठी चर्चेत असलेल्या राफेल विमानांची सुमारे 23 वर्षांनंतर खरेदी झाली. अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि उत्तम टेक्नॉलॉजीने सुसज्ज असं राफेल विमान आहे.
राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये
1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.
2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.
4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.
8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
संबंधित बातम्या
राफेल विमानांचं भारतीय भूमीवर सुरक्षित लॅण्डिंग, अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये दाखल
शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार!
Rafale | राफेल विमान भारताला सुपूर्द, पहिल्या राफेल विमानातून संरक्षणमंत्र्यांचं उड्डाण