Punjab CM News: भगवंत मान आज राज्यपालांकडे करणार सरकार स्थापनेचा दावा करणार, 16 मार्चला शपथविधी
आज भगवंत मान हे राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. काल झालेल्या बैठकीत 'आप'च्या नवनिर्वाचित आमदारांनी मान यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड केली होती.
Punjab CM News : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार कामगिरी करत बहुमत मिळवले आहे. त्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी भगवंत मान यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आज भगवंत मान हे राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. काल झालेल्या बैठकीत 'आप'च्या नवनिर्वाचित आमदारांनी मान यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड केली होती. मान हे येत्या 16 मार्चला नवांशहर जिल्ह्यातील शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तशी त्यांनी घोषणा देखील केली आहे.
'आप'च्या आमदारांना मान काय म्हणाले?
निकालानंतर, शुक्रवारी मोहालीत झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत भगवंत मान यांची आप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शनिवारी ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. यावेळी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भगवंत मान यांनी निवडून आलेल्या आमदारांना सांगितले की, कोणीही अहंकार बाळगू नका. ज्यांनी आपल्याला मतदान केले नाही त्यांचाही आदर केला पाहिजे. सर्व आमदारांनी केवळ चंदीगडमध्ये न राहता ज्या भागातून ते निवडून आले आहेत, त्या भागात काम करावं असे आवाहन यावेळी मान यांनी केले आहे.
भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला कोण उपस्थित राहणार?
भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. त्यावेळी अमृतसरमध्ये 'आप'च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी रोड शो देखील करणार आहेत. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी 15 वी विधानसभा विसर्जित केली. याआधी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर चरणजित सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. चन्नी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आता आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: