(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही'; कॅप्टन अमरिंदर सिंहांचा हायकमांडला निर्वाणीचा इशारा
Punjab Congress Crisis : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) आणि सिद्धू यांच्यातील वाद टोकाला पोहोचला असून हायकमांडला अद्याप त्यावर तोडगा काढता आला नाही.
चंदीगड : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच भडकण्याची शक्यता आहे. 'आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खदखद बाहेर पडली असून त्यांनी आता 'आर या पार' अशी भूमिका घेतली आहे.
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना सांगितलं आहे की, "आतापर्यंत अशा प्रकारचा अपमान खूप झाला आहे. असा अपमान सहन करत मी पक्षात राहू शकत नाही."
पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून देण्यात आला असून त्यासाठी पर्यवेक्षक म्हणून हरीश रावत आणि अजय माकन उपस्थित राहणार आहेत. जवळपास 40 हून अधिक नाराज आमदारांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पदावरुन हटवावं अशी भूमिका घेत हायकमांडला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद आता भडकण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :