एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर प्रदेशच्या रणमैदानात तीन देवींचा चमत्कार चालणार?
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केल्यानंतर, यादव परिवारातील आणखी एक चेहरा राजकारणात आपले नशिब आजमावत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला सावत्र भाऊ प्रतीक यादव याची पत्नी अपर्णा यादव यांना लखनऊ कँटमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही प्रियंका गांधी आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेसला एक बळकटी मिळेल असे आंदाज वर्तवले जात आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांची पत्नी डिम्पल यादव यांनाही राजकारणातील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकीय रणधुमाळीत तीन महिला काय चमत्कार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
समाजवादी पक्षाने सध्या काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने प्रियंका गांधी, डिम्पल यादव आणि अपर्णा यादव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या तिन्ही नावांची चर्चा होण्याआधी अखिलेश यादव यांनी लखनऊ कँटमधून अपर्णा यादव यांनाच का निवडणुकीच्या मैदानात उतरवले? यावरही उहापोह होणे गरजेचे आहे. कारण लखनऊ कँट विधानसभा क्षेत्रावर समाजवादी पक्षाला एकदाही वर्चस्व मिळवता आले नाही.
त्यामुळे अपर्णा यादव यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे राजकीय मैदान जिंकण्यासाठी लखनऊमध्ये आग्नीपरिक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्या विरोधात भाजपने रिता बहुगुणा जोशी यांना मैदानात उतरवले आहे.रिता बहुगुणा जोशीच या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करत होत्या. पण त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपत प्रवेश केल्याने लखनऊ कँटमधील जनता आता कोणाच्या पारड्यात आपले दान टाकतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेसने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसला आपली सर्व ताकद आणि यंत्रणा अपर्णा यादव यांच्या पाठीमागे उभी करावी लागणार आहे. तर भाजपने ही या जागेसाठी जोरदार तयारी केलेली आहे.
अपर्णा यादव यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केल्यास 2014 रोजी त्यांनी स्वत:च्याच सरकारवर टीका करुन अखिलेश यादव यांचा एकप्रकारे रोष ओढावून घेतला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचे पती प्रतीक यादव यांना उमेदवारी हवी असूनही, अखिलेश यादव यांच्या विरोधामुळे शांत बसावे लागलं होतं. अपर्णा इतकेच करुन थांबल्या नव्हत्या, तर एका कार्यक्रमात त्या राजनाथ सिंह यांच्यासोबत एकत्रित व्यासपीठावर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. समाजवादी पक्षातील गृहकलह शांत झाल्यानंतर आता ही जागा अपर्णा यादव यांना दिली गेल्याने सध्या तरी यासंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अपर्णा यादव राजकीय पटलावर वावरताना, एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे वावरतात. गेल्या काही दिवसांपूर्वी यादव कुटुंबात जो गृहकलह सुरु होता, त्यावेळीही त्यांनी मौन धारण केलं होतं. पण दुसरीकडे मुलायम सिंह यादव यांच्या निकटवर्तींयामध्ये गणना होण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे काही दिवसांतच त्यांची ओळख शिवपाल गटातील एक शक्तीशाली तरुण नेत्या म्हणून होत होती.
तर दुसरीकडे पिता-पुत्रामध्ये सुरु असलेल्या संघर्षात मुख्यमंत्र्यांची पत्नी डिम्पल यादव यांनीही शांत राहणे पसंत केलं होतं. पण आता पिता-पुत्राच्या संघर्ष शांत झाला असून,या दोन जावा काय चमत्कार दाखवतील? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दोन जावांच्या या राजकीय स्पर्धेमध्ये आणखी एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे, ती म्हणजे काँग्रेसच्या प्रियंका गांधींची. प्रियंका गांधी मुख्यमंत्र्यांची पत्नी डिम्पलसोबत प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांना साथ देतील असे आशा व्यक्त केली जात आहे. पण या दोघींमध्ये अपर्णा यादव यांना कितपत स्थान मिळेल हे सांगणे सध्यातरी आवघड आहे. पण विधानसभा निवडणुकीच्यानिमित्त राजकारणाचा रंग या तीन देवींभोवतीच फिरेल हे मात्र नक्की!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement