(Source: ECI/ABP News/ABP Majha)
President Election : कॅप्टन अमरिंदर सिंह एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? पंजाबमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजपची रणनीती?
President Election : पंजाबमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.
President Election : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पंजाबमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजप ही रणनीती अवलंबणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष 'पंजाब लोक काँग्रेस' हा लवकरच भाजपमध्ये विलीन होऊ शकतो असे बोलले जात आहे. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये तत्वत: करार झाला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. यामुळे भाजपला पंजाबमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाटी मदत होऊ शकते, परंतु कॅप्टन अमरिंदर सिंह यांना त्या बदल्यात काय मिळेल यावर अटकळ सुरू आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवून भाजप शीख समुदायामध्ये चांगली प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह हे सध्या मणक्याच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांचे लंडनमध्ये ऑपरेशन झाले असून ते सध्या विश्रांती घेत आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत. त्यांना या आजारातून बरे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. प्रकृतीच्या कारणास्तव कॅप्टन यांना त्यांच्या पक्षाला वेळ देता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पक्ष फारसा चालवता आला नाही. त्यामुळे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या कॅप्टन यांना पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाला मजबूत स्थितीत आणण्यात अपयश आले. एनडीएसोबत युती करून पक्षाने पंजाबमध्ये 28 जागा लढवल्या, परंतु त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांची प्रकृती पाहता ते पक्ष फार सक्रियपणे चालवू शकतील असे वाटत नाही. त्यामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांचे भवितव्य अंधारात पडले आहे. अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंह आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करतील, असे बोलले जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली तर पंजाब विधानसभेच्या पुढील निवडणुकी भाजपला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर काँग्रेसला धक्का देण्यातही ते यशस्वी ठरू शकते.