Mann Ki Baat : आणीबाणीतही लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला नाही : पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'मध्ये वक्तव्य
Mann Ki Baat : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.
PM Modi Mann Ki Baat : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. या मालिकेचा आजचा 90 वा भाग होता. मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानानांनी देशातील आणीबाणीची परिस्थिती आणि युवकांवर संवाद साधला. पंतप्रधान नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊ.
आणीबाणीविषयी बोलताना पंतप्रधान युवा पिढीला संबोधिक करत म्हणाले, तुमचे आई-वडील तुमच्या वयाचे होते, त्यावेळी एकदा त्यांच्याकडून जगण्याचा अधिकारच काढून घेतला होता, हे तुम्हा मंडळींना माहिती आहे का? माझ्या नवतरूण मित्रांनो, आपल्या देशामध्ये मात्र, एकदा असे घडले होते. काही वर्षोंपूर्वी म्हणजेच, 1975 सालची ही गोष्ट आहे. जून महिन्यात, म्हणजे याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते.
पुढे पंतप्रधान म्हणाले, घटनेतल्या कलम 21 अंतर्गत सर्व भारतीयांना मिळाला आहे- ‘राइट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी’- म्हणजेच ‘जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क! त्या काळी भारतातल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला गेला. देशातली न्यायालये, प्रत्येक घटनादत्त संस्था, प्रकाशन संस्था - वर्तमानपत्रे, अशा सर्वांवर नियंत्रण, अंकूश लावण्यात आले होते. लावलेल्या सेन्सॉरशिपमुळे सरकारच्या स्वीकृतीविना काहीही छापणे, प्रसिद्ध करणे शक्य नव्हते.
आणीबाणी संबंधित नरेंद्र मोदी म्हणाले, "मला आठवतेय, त्या काळामध्ये लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी सरकारची ‘‘वाहवाह’’, करण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्या काळी हजारो लोकांना अटक केली गेली आणि लाखों लोकांवर अत्याचार केल्यानंतरही भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला नाही की हा विश्वास कणभरही कमी झाला नाही.
भारतातल्या आपल्या लोकांवर अनेक युगांपासून जे लोकशाहीचे संस्कार झाले आहेत, सर्वांमध्ये लोकशाहीची जी भावना नसा-नसांमध्ये भिनली आहे, शेवटी त्याच भावनेचा विजय झाला. भारतातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीनेच आणीबाणी हटवून, पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना केली. हुकूमशाहीच्या मानसिकतेचा, हुकूमशाहीच्या वृत्ती-प्रवृत्तीचा लोकशाहीच्या पद्धतीने पराभव केला जाणे, असे उदाहरण संपूर्ण जगामध्ये पहायला मिळणे अवघड आहे.
पुढे पंतप्रधान म्हणाले, "आणीबाणीच्या काळामध्ये देशवासियांच्या संघर्षाचे साक्षीदार होण्याचे, लोकशाहीचा एक सैनिक या नात्याने - या घटनेचा भागीदार होण्याचे भाग्य मलाही मिळायचे होते." "देश आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्यावेळीही आणीबाणीचा तो भयावह काळ आपण कधीच विसरून चालणार नाही."
देशातील युवा पिढीला संबोधून पंतप्रधान म्हणाले, "आगामी पिढ्यांनाही त्याचे विस्मरण होऊ नये. अमृत महोत्सव म्हणजे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून झालेल्या मुक्ततेची विजयी गाथाच आहे, असे नाही; तर स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या प्रवासाचाही त्यामध्ये सहभाग आहे. इतिहासाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यांकडून नवे काही शिकून, आपण पुढे जात असतो."
आज मन की बात या कार्यक्रमाचा 90 वा भाग होता. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.
महत्वाच्या बातम्या :
Mann Ki Baat : पंतप्रधानांची 'मन की बात' आज; 90व्या संवादाकडे देशवासियांचं लक्ष