मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार; एअर स्ट्राईकनंतर पहिल्यांदाच टीव्हीवर
भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सीमारेषेवरील कारवायांची माहिती देण्यात आली. नुकतेच, तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केले.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान आज नेमकं काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. कारण, भारतीय हवाई दलाने 7 मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी (Terrorist) तळांवर हल्ले केले होते. या लष्करी कारवाईनंतर सैन्य दलाच्या प्रमुखांनी आणि परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मात्र, एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठलेही अधिकृत स्टेटमेंट दिले नव्हते किंवा कुठेही भाष्य केले होते. आता, हल्ल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करणार आहेत.
भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सीमारेषेवरील कारवायांची माहिती देण्यात आली. नुकतेच, तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केले. तसेच, भारतीय वायू दलाचे सर्वत तळ शाबूत असून आपले सर्व एअर पायलट सुरक्षित असल्याची माहितीही एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिली. या पत्रकार परिषदेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार असून पाकिस्तानला काय इशारा देतात हे पाहावे लागेल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला असून काल म्हणजेच रविवार दुपारपासून सीमारेषेवर कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे, दोन्ही देशातील सैन्य कारवायांना ब्रेक मिळाला आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतील, भारत-पाक युद्धाबाबत काय माहिती देतील याची उत्सुकता भारत-पाकिस्तान यांच्यातील नागरिकांसह जगभरातील देशांना लागली आहे.
हल्ल्यापूर्वी एबीपीच्या कार्यक्रमात मोदींची उपस्थिती
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 मे रोजी रात्री 10 वाजता एबीपी न्यूज नेटवर्कच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी रात्री उशिरापर्यंत काम करायचं आहे, असे म्हणत एअर स्ट्राईक हल्ल्याची हिंट देखील दिली होती. दरम्यान, गेल्या 5 दिवसांत नरेंद्र मोदींनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाषण केले नाही किंवा सोशल मीडियावरुनही भूमिका मांडली नाही. याशिवाय संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री, सैन्य दलातील प्रमुख अधिकारी आणि सुरक्षा सल्लागार यांच्यासमवेत मोदींच्या बैठका सुरू होत्या. त्यानुसार, पाकिस्तानविरोद्धच्या कारवाईची रणनीती या बैठकांमध्ये ठरत होती. त्यामुळेच, आता युद्धविरामानंतर मोदी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Prime Minister Narendra Modi will address the nation at around 8 PM today. pic.twitter.com/NobQiY66Nh
— ANI (@ANI) May 12, 2025
























