PM Narendra Modi : 2024 मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, सूरतमध्ये पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी सुरतमधील विमानतळ आणि सूरत डायमंड बोर्सच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. सुरत डायमंड बोर्स हे जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी 17 डिसेंबर रोजी सूरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले. याला 'सूरत डायमंड बोर्स' (Surat Diamond Bourse) असेही म्हणतात. ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे. यापूर्वी हे यश पेंटागॉनच्या नावावर होते. यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सूरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे.
सूरत डायमंड बोर्स व्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी सूरत विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन केले. टर्मिनल इमारत सर्वात व्यस्त असतानाही 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाताळण्यास सक्षम आहे. त्याचवेळी, सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे, जे जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स आहे. संपूर्ण जगभरात सूरत हे हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
देशभरात मोदी गॅरंटीचा चर्चा
लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल मोदींच्या गॅरेंटीची चर्चा होत आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल आल्यानंतर त्याचीच अधिक चर्चा हल्ली होतेय. देशातील कष्टकरी जनतेने 'मोदींच्या गॅरेंटी'चे वास्तवात रुपांतर करताना पाहिले असून 'सूरत डायमंड बोर्स' हेही याच गॅरेंटीचे उदाहरण आहे. सूरतच्या हिऱ्याला वेगळीच चमक आहे. ती जगभर ओळखली जाते. तसेच सूरतमध्ये आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली आहे.
सूरतच्या लोकांनी त्याला डायमंड सिटी बनवले - पंतप्रधान मोदी
ही इमारत भारतीय डिझायनर, भारतीय साहित्य आणि भारतीय संकल्पना यांच्या क्षमतांचे उदाहरण आहे. ही इमारत नव्या भारताच्या नव्या ताकदीचे आणि नव्या संकल्पाचे प्रतीक आहे.सूरत एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होते. इथल्या लोकांनी आपल्या मेहनतीने डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवली आहे. आज सूरत हे लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे. आता सूरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत आहे, असं सूरत डायमंड बोर्सविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
भारत टॉप - 3 अर्थव्यवस्था होणार - पंतप्रधान मोदी
तुम्हा सर्वांना माहिती आहे की, गेल्या 10 वर्षांत भारत आर्थिक शक्तीमध्ये 10व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आता मोदींनी देशाला खात्री दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप - 3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावर त्यांनी म्हटलं की,आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक ब्रँड बनला आहे.
2024 मध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळेल
लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामान्य नागरिकाच्या मनात हमी बोलताच चार प्रमुख निकष समोर येतात. जे काही या चार मापदंडांची पूर्तता करते तो हमीचा आधार बनतो. त्यांनी सांगितले की हे चार निकष आहेत – धोरण, हेतू, नेतृत्व आणि कामाचा ट्रॅक.आम्ही तीन राज्यात सरकारे स्थापन केली आहेत, तेलंगणातही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे दिसून येते.