West Bengal : ममता बॅनर्जींनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांचे अभिनंदन केलं आहे
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी आज तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांना राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ममता बॅनर्जीना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून शुभेच्छा देताना म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदींचे अभिनंदन.
Congratulations to Mamata Didi on taking oath as West Bengal’s Chief Minister. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2021
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शपथविधीचा हा कार्यक्रम काही मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. त्यावेळी पार्थ चटर्जी, सुब्रतो मुखर्जी तसेच प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावर काम करण्याला प्राथमिकता असेल असं सांगितलं आहे.
राज्यात शांतता राखण्याचे आवाहन
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांना राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केलं. बंगालला हिंसा पसंत नाही, त्यामुळे राज्यात शांतता राखणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्या म्हणाल्या.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 292 पैकी 213 जागांवर विजय प्राप्त केला आहे आणि सलग तिसऱ्यांदा सत्ता पटकावली आहे. भाजपला 77 जागांवर समाधान मानावं लागलं असून इतर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. महत्वाचं म्हणजे डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीला राज्यात एकही जागा मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Patanjali: उत्तराखंड सरकारच्या मदतीने पतंजलीची दोन कोरोना रुग्णालयं सुरु, बाबा रामदेव यांची माहिती
- Tejasvi Surya: बंगळुरुतील रुग्णालयांत पैशासाठी 'बेड घोटाळा', भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचा येडियुराप्पा सरकारवर गंभीर आरोप
- Oxygen Plant : ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राकडून देशभरात उभारले जाणार 581 PSA प्लांट - नितीन गडकरी