नेहरूंना त्यांच्या प्रतिमेची चिंता... म्हणून गोवा 15 वर्षे पारतंत्र्यात; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
PM Modi Speech: सरदार पटेलांप्रमाणे नेहरूंनी गोव्यासंबंधी धोरण आखलं असतं तर गोव्याला स्वातंत्र्य मिळायला 15 वर्षे उशीर लागला नसता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवर हल्लाबोल कायम ठेवला आहे. पंडित नेहरूंना गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त चिंता होती म्हणून गोव्याला 15 वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते आज संसदेत बोलत होते.
गोव्याच्या स्वातंत्र्याच्या 60 वर्षांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सरदार पटेल यांनी ज्या प्रकारे हैदराबाद, जुनागडसाठी धोरण आखलं होतं, त्याचप्रमाणे त्यांनी गोव्यासाठी धोरण आखलं असतं तर गोव्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी 15 वर्षांपेक्षा जास्त वाट पाहावी लागली नसती. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सवरून असं दिसून येतं की, तत्कालीन पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी होती. भारताच्या बंधू-भगिनींवर गोळीबार होत होता पण तत्कालीन पंतप्रधानांनी लष्कर पाठवण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत गोव्यातील अनेकांना आपल्या प्राणाचा त्याग करावा लागला. 15 ऑगस्ट 1955 रोजी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहरुंनी गोव्यात लष्करी कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघराज्य पद्धतीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचण्याचा सल्ला विरोधकांना दिला. पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील एक संदर्भ वाचून दाखवला. फेडरेशन एक युनियन आहे. प्रशासनाच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती होऊ शकते. मात्र, देश अभिन्न आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
दरम्यान, सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. देशातील महागाई ही सरकारच्या हाताबाहेर आहे, जगभरातल्या घडामोडींचा भारतातील महागाईवर परिणाम होत असल्याचं सांगत नेहरुंनी त्या वेळी महागाईची जबाबदारी झटकली होती. पण कोरोना काळातही महागाईचा दर 5.2 टक्क्क्यांपर्यंत ठेऊन आमच्या सरकारने ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं.
संबंधित बातम्या: