आज फक्त नेहरु अन् नेहरुच...तुम्ही फक्त आनंद घ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा नेहरुंवर टीका
काँग्रेसच्या काळात महागाईचा दर हा डबल डिजिटमध्ये होता, आपल्या काळात कोरोनासारखी परिस्थिती असतानाही महागाईचा दर हा 5.2 टक्क्यांवर राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. देशातील महागाई ही सरकारच्या हाताबाहेर आहे, जगभरातल्या घडामोडींचा भारतातील महागाईवर परिणाम होत असल्याचं सांगत नेहरुंनी त्या वेळी महागाईची जबाबदारी झटकली होती. पण कोरोना काळातही महागाईचा दर 5.2 टक्क्क्यांपर्यंत ठेऊन आमच्या सरकारने ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं.
नेहरुंनी महागाईची जबाबदारी झटकली होती...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, जागतिक गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या नव्हत्या त्या काळात नेहरु म्हणाले होते की, कोरियातील लढाईचा परिणाम हा आपल्या देशातील महागाईवर होतोय. कोरियातील युद्धामुळे आपल्या देशातील वस्तुंच्या किंमती वाढतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरुंनी देशातील महागाईची जबाबदारी झटकली होती."
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "जर अमेरिकेमध्ये काही झालं तर त्याचा परिणामही आपल्या देशाच्या महागाईवर होतोय. पण आमच्या सरकारने कोरोना काळातही महागाईचा दर हा 5.2 टक्क्यांवर नियंत्रित ठेवलं. कॉंग्रेसच्या काळात जर कोरोनाची परिस्थिती असती तर त्यांनी महागाईची जबाबदारी ही कोरोनावर ढकलली असती आणि आपले हात झटकले असते."
Pandit Nehru had said that the Korean war caused inflation. He had said that any disturbance in America also caused inflation. He also gave up on inflation: PM Modi in Lok Sabha pic.twitter.com/QXLZhy1NXZ
— ANI (@ANI) February 7, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधीही अनेक वेळा जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली आहे. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नेहरु आणि काँग्रेसवर टीका केल्याचं दिसून आलं.
संबंधित बातम्या:
- एवढ्या वेळा पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही, संसदेचा वापर हा देशहितासाठी करावा; पंतप्रधानांचा कॉंग्रेसला टोला
- PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल, कोरोनापासून महागाईपर्यंत काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
- रेल्वेचा कंट्रोल तुमच्याकडे होता, तुम्हीच रेल्वे सुरु केली, काँग्रेसचा मोदींवर पलटवार