PM Modi Speech : आमच्या स्वच्छता मोहिमेची खिल्ली उडवली, पण सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2300 कोटी कमावले : नरेंद्र मोदी
PM Modi Lok Sabha Speech : गेल्या दहा वर्षांत 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना शोधून काढलं आणि 3 लाख कोटी रुपये चुकीच्या लोकांच्या हाती जाण्यापासून वाचवलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi Lok Sabha Speech : लोकांनी आम्हाला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि आतापर्यंत 40 लाख कोटी रुपये लोकांच्या खात्यावर जमा केले. पण काही लोक फक्त गरिबांच्या झोपडपट्टीत जातात आणि फोटोसेशन करतात असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत विरोधकांना टोला लगावला. आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली, पण त्याच माध्यमातून सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2300 कोटी रुपये कमावले असल्याचंही मोदी म्हणाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तरं दिली.
विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेची काही जणांनी खिल्ली उडवली. पण आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की या मोहिमेमुळे देशात स्वच्छता नांदू लागली आहे. याच स्वच्छता मोहिमेमुळे अलीकडच्या काळात सरकारी कार्यालयांतून विकल्या जाणाऱ्या भंगारातून 2300 कोटी रुपये वसूल झाले आहेत. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे आम्ही फक्त विश्वस्त म्हणून काम करतोय.
एक लाख कोटींची बचत
गेल्या दहा वर्षांपासून भारत हा उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आम्ही इथेनॉलच्या निर्मितीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी झाली. त्यावरील खर्च कमी झाला. या निर्णयामुळे एक लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि ते सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहेत. गेल्या दहा वर्षांत एकही घोटाळा झाला नाही. या काळात सरकारचे लाखो कोटी रुपये वाचले आणि ते लोकांच्या सेवेसाठी वापरले गेले.
10 कोटी बनावट लाभार्थी बाहेर काढले
या आधीच्या सरकारच्या काळात देशातील 10 कोटी बनावट लोकांच्या नावाखाली अनेक योजनांचा लाभ घेतला जायचा. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्या 10 कोटी बनावट नावांवर आम्ही फुली मारली. त्या त्या योजनांचे खरे लाभार्थी आम्ही शोधून काढले. त्यामुळे सुमारे 3 लाख कोटी रुपये हे चुकीच्या लोकांच्या हाती जाण्यापासून वाचले. आता हे 3 लाख कोटी रुपये कोण खात होतं हे मी सांगणार नाही.
40 लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात जमा
देशाने आम्हाला संधी दिली आणि जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. बचत आणि विकास हे आमचे मॉडेल आहे. जन धन, आधार, मोबाईल ही रत्न त्रिमूर्ती (JAM) आम्ही तयार केली. DBT द्वारे थेट लाभ हस्तांतरण देण्यास सुरुवात केली. आम्ही 40 लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात जमा केले.
जनतेसाठी 30 हजार कोटी रुपये शिल्लक
आम्ही देशाचा पैसा हा शिश महाल बांधण्यासाठी वापरला नाही, तर तो देश घडवण्यासाठी वापरला. पायाभूत सुविधांचे बजेट 1.80 लाख कोटी रुपये होते. आज ते बजेट 11 लाख कोटी रुपये आहे. सरकारी तिजोरीत बचत ही एक गोष्ट आहे आणि सामान्य माणसालाही बचतीचा लाभ मिळायला हवा, हे आम्ही ध्यानात ठेवले. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या उपचारासाठी सुमारे 1 लाख 20 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. जनऔषधी केंद्रात औषधं खरेदीवर 80 टक्के सवलत आहे. जनतेसाठी 30 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत.
25 कोटी लोक गरिबीतून बाहेर
राष्ट्रपतींचे अभिभाषण सर्वसामान्यांना विकसित भारताबद्दल प्रेरणा देणारे आहे. आमच्या सरकारच्या काळात 25 कोटी लोक हे दारिद्र रेषेतून बाहेर आले आहेत. पाच दशके आम्ही गरिबी हटवण्याचे नारे ऐकले आणि आता 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ही गोष्ट पूर्ण संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केल्यानेच शक्य झालं.
ही बातमी वाचा :























