(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : भारतातील पहिली 'अंडरवॉटर मेट्रो! पंतप्रधान 6 मार्चला उद्घाटन करणार, काय आहे खासियत?
PM Modi : देशातील पहिल्या अंडरवॉटर म्हणजेच पाण्याखालील मेट्रो बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर म्हणजेच पाण्याखालील मेट्रो बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मेट्रो हावडा मैदान ते एस्प्लेनेड दरम्यान धावणार आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी कोलकाता येथे कोट्यवधी रुपयांच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवी सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातला-माजेरहाट मेट्रो सेक्शनचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याखालील मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली धावेल. त्यामुळे लोकांचा येण्या-जाण्याचा वेळ कमी होईल. ती सेक्टर V ते हावडा पर्यंत धावेल. हुगळी नदीच्या खाली धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो रेल्वे नदी आणि हावडा यांना कोलकाता शहराशी जोडेल.
भारतातील हुगळी नदीखाली बांधलेला पहिला बोगदा
कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो बोगदा हा भारतातील हुगळी नदीखाली बांधलेला पहिला बोगदा आहे. यासह, हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. याशिवाय माजेरहाट मेट्रो स्टेशन (तरताळा - माजेरहाट मेट्रो विभागाचे उद्घाटनही होणार आहे) हे अभियांत्रिकीचे एक अनोखे चमत्कार आहे. हे एकमेव मेट्रो स्टेशन आहे जे थेट रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या वर बांधले गेले आहे.
'अनेक दिवसांचे स्वप्न साकार होणार'
कोलकाता मेट्रो रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, कोलकातामधील लोकांना पंतप्रधान मोदींनी दिलेली ही भेट आहे. या उद्घाटनाने अनेक दिवसांचे स्वप्न साकार होणार आहे.
पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरसाठी पाण्याखालील बोगदा बांधला
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की कोलकाता मेट्रोचे काम 1970 च्या दशकात सुरू झाले होते, परंतु मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली प्रगती मागील 40 वर्षांपेक्षा खूपच जास्त आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांचे लक्ष पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि देशाचा पाया रचण्यावर आहे, जे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र असेल. कोलकाता मेट्रोचे काम अनेक टप्प्यांत पुढे गेले. सध्याच्या टप्प्यात शहरातील पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरसाठी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.
हेही वाचा>>>
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे उद्घाटन आज, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास होणार सुलभ, मंत्री दादा भुसे करणार लोकार्पण