Indian Railway | 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला रेल्वे नेटवर्कने जोडणार, पंतप्रधानांनी दाखवला आठ नव्या गाड्यांना हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला (Statue of Unity) देशातील अन्य महत्वाच्या भागांशी जोडण्याऱ्या आठ नव्या रेल्वे गाड्यांना (Indian Railway ) हिरवा झेंडा दाखवला आहे. केवडिया परिसर (Kevadia Gujarat) जगातील सर्वाधिक मोठ्या पर्यटक क्षेत्राच्या स्वरुपात विकसित होत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीला देशातील महत्वाच्या भागांशी जोडण्याऱ्या आठ नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. त्याच सोबत पंतप्रधानांनी गुजरातमधील रेल्वेशी संबंधित विविध योजनांचे उद्घाटन केलं.
या प्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, "एकाच वेळी देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच ठिकाणाला जोडण्यासाठी एवढ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. देशाला 'एक भारत, श्रेष्ठ भारत' असा मंत्र देणाऱ्या सरदार पटेलांचा जगातला सर्वात मोठा पुतळा या ठिकाणी आहे. हीच ओळख केवडिया भागाची आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्यासाठी आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जास्त पर्यटक येत आहेत. आतापर्यंत जवळपास 50 लाख पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी या भागात आले आहेत. आज केवडियाची ओळख गुजरातमधील एक छोटासा ब्लॉक अशी राहत नसून हा भाग जगातील सर्वाधिक मोठ्या पर्यटक क्षेत्राच्या स्वरुपात विकसित होत आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे कशा प्रकारे मेळ घालता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे केवडिया हा परिसर आहे. या परिसरात वाढत्या पर्यटनामुळे इथल्या आदिवासी युवकांना रोजगार मिळाला आहे. या लोकांच्या जीवनात अत्याधुनिक सुविधा जलदगतीने पोहचत आहेत."
जगातील पहिली डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन सुरु, मोदी म्हणाले- येणारा काळ वैभवशाली असेल
या कार्यक्रमाच्या प्रसंगी रेल्वे मंत्री पियूष गोयल उपस्थित होते. पियूष गोयल म्हणाले की, "सरदार पटेलांनी देशाला जोडण्याचं काम केलं आहे. आता भारतीय रेल्वे सरदार पटेलांच्या प्रतिमेला देशाशी जोडत आहे."
स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या या आहेत आठ नव्या गाड्या-
- महामना एक्सप्रेस, केवडिया ते वाराणासी, प्रत्येक आठवड्यातून एकदा
- दादर-केवडिया एक्सप्रेस, दर दिवशी
- जन शताब्दी एक्सप्रेस, अहमदाबाद ते केवडिया, दर दिवशी
- निजामुद्दीन-केवडिया संपर्क क्रांती एक्सप्रेस, दिल्ली ते केवडिया, आठवड्यातून दोन वेळा
- केवडिया-रीवा एक्सप्रेस, केवडिया ते रीवा, आठवड्यातून एकदा
- चेन्नई-केवडिया एक्सप्रेस, आठवड्यातून एकदा
- एमईएमयू ट्रेन, प्रताप नगर ते केवडिया, दर दिवशी
- एमईएमयू ट्रेन, केवडिया ते प्रतापनगर, प्रत्येक दिवशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री आणि कृषी मंत्री यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार