GST: रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी कर नाही, मग व्हिलचेअरवर कर का? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
GST Rate Hike : व्हिलचेअरवर लावण्यात आलेल्या जीएसटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
GST Rate Hike : केंद्र सरकारने जीएसटी परिषदेच्या शिफारसीवर लागू केलेल्या नव्या जीएसटीवरून (GST Rate Hike) नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या आठवड्यापासून काही वस्तूंवर जीएसटी लागू झाला आहे. केंद्र सरकारने ब्रेल पेपर आणि व्हिलचेअरवरही जीएसटी लागू (GST On Wheelchair Braille Paper) केला आहे. त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
या आठवड्यापासून लागू झालेल्या जीएसटीमध्ये अन्नधान्यासह वैद्यकीय सेवा, उपकरणांवरही जीएसटी लागू करण्यात आला आहे. यापैकी काही वस्तूंवर पहिल्यांदाच जीएसटी आकारणी होत आहे. अन्नधान्यासह काही वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांचे बजेट बिघडले आहे. वैद्यकीय उपकरणावर लागू करण्यात आलेल्या जीएसटी विरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली.
केंद्र सरकारने ब्रेल पेपरवर आणि दिव्यांगांसाठी असलेल्या व्हिलचेअरवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. एका निरोगी व्यक्तीला चालण्यासाठी कर द्यावा लागत नाही. पण दिव्यांगांना व्हिलचेअरसाठी पाच टक्के जीएसटी द्यावा लागत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी उपस्थित केला. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अंत्यविधीच्या वस्तूंवर जीएसटी नाही
केंद्र सरकारने (Central Government) अंत्यसंस्कार, स्मशानभूमी अथवा शवागारगृह सेवेवर सरकारने जीएसटी लागू केला आहे. या वस्तूंवर केंद्र सरकारने 18 टक्के जीएसटी लागू केला जात असल्याचे वृत्त होते. केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. PIB Fact Check ने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अंत्यविधीशी निगडित असलेल्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याचे वृत्त निराधार आहे. अंत्यसंस्कार, दफनविधी, स्मशान अथवा शवागारगृहाच्या सेवांवर कोणताही जीएसटी लागू करण्यात आला नाही. 18 टक्के लागू करण्यात आलेला जीएसटी हा यासंबंधीच्या कामासाठी असलेल्या कंत्राटावर लावण्यात आला आहे, असेही पीआयबीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.