विवाहित प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणं अनैतिक; बलात्काराच्या आरोपांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
Punjab Haryana High Court: विवाहित प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणं अनैतिकआहे. महिलेची बलात्काराच्या आरोपांची याचिका हायकोर्टानं फेटाळली.

Punjab Haryana High Court : पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab Haryana High Court News) गुरुवारी (9 फेब्रुवारी) मोठा निर्णय दिला आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी बलात्काराच्या (Rape) आरोपीला दोषमुक्त करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी महिलेची याचिका पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab Haryana High Court) फेटाळून लावली आहे. आरोपीने लग्नाचं आमीष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला होता. परंतु तो विवाहित असल्याचं समजताच तिने त्याला टाळण्यास सुरुवात केली. न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं की, "जर महिलेला आधीच माहित असेल की, तिचा प्रियकर विवाहित (Married) आहे आणि तरीही ती महिला त्याच्याशी संबंध ठेवत असेल तर लग्नाच्या बहाण्याने बलात्काराची याचिका स्वीकारता येणार नाही."
लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध
एका महिलेच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा केला होता की, "आरोपीने अनेकदा तिचा पाठलाग करुन तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले, तेव्हा आरोपीने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने एक दिवस तिला अंमली पदार्थ दिले आणि संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नशेच्या धुंदीत पीडितेला आरोपीचा प्रतिकार करता आला नाही आणि त्यानंतर आरोपीने तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. तो तिला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारणा करायचा. त्यानंतर पीडितेला आरोपीने लग्न करण्याचं आमीष दाखवलं. मात्र काही काळाने आरोपी विवाहित असल्याचं महिलेला समजल्यानंतर तिने त्याला टाळण्यास सुरुवात केली."
FIR दाखल
महिलेने याचिकेत म्हटलं आहे की, "जेव्हा तिने आरोपीपासून दूर राहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यातच महिलेने तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं असता आरोपीने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली." संबंधित महिलेने 2018 मध्ये जिंदमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी सुरु होती आणि ट्रायल कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर महिलेने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या संपूर्ण प्रकरणात महिलेचा कोणताही विरोध दिसला नसल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आरोपी विवाहित असल्याचं महिलेला कळलं, अशा परिस्थितीत तिचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही हे देखील महिलेसमोर आलं, त्यानंतरही तिने आरोपीशी संबंध ठेवले. यानंतर उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
