ऑस्ट्रेलियातील लोक उंदरांमुळे त्रस्त; ऑस्ट्रेलियन सरकारकडून भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी
मोठ्या प्रमाणात उंदीर असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. उंदीर त्यांचे पीक नष्ट करत आहेत.
सिडनी : जगात सध्या कोविड 19 च्या साथीचा उद्रेक सुरु आहे. एकीकडे जग कोरोनाला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला आणखी एक संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांमुळे दहशत निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियात उंदरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेथे Biblical Plague जाहीर करण्यात आला आहे. तेथील सरकारने भारताकडून 5000 लिटर ब्रॉमेडीओलोन विषाची मागणी केली आहे, जेणेकरून उंदरांच्या या समस्येचा नायनाट करता यावा.
मोठ्या प्रमाणात उंदीर असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. उंदीर त्यांचे पीक नष्ट करत आहेत. परिस्थिती इतकी भंयकर बनली आहे की लोकांच्या अंथरुणात घुसून उंदीर लोकांना चावा घेत आहेत. एका कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीसाठी त्यांनी उंदरांना जबाबदार ठरवलं. कारण वायर चावल्याने शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली होती. उंदरांमुळे निर्माण झालेल्या कठीन स्थितीमुळे यावर तोडगा काढण्यासाठी तेथील सरकार प्रयत्न करत आहे.
उंदरांची संख्या कमी न झाल्यास आर्थिक आणि सामाजिक संकट
कृषिमंत्री अॅडम मार्शल यांनी सांगितली की, आम्ही सध्या एका गंभीर समस्येतून जात आहोत. आम्ही लवकरात लवकर उंदीरांची संख्या कमी केली नाही तर ग्रामीण आणि न्यू साउथ वेल्समध्ये आम्हाला संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या सरकारने या घटनेचे अभूतपूर्व असे वर्णन केले आहे. ब्रुस बार्नेस नावाच्या एका शेतकऱ्याने सांगितले की, मध्य न्यू साऊथ वेल्स शहर बोगन गेटच्या जवळ त्याच्या शेतात पिक लावून तो एका प्रकारे जुगार खेळत आहे. आम्ही फक्त पेरणी करत आहोत आणि आशा आहे की मेहनत वाया जाणार नाही.
अनेक लोक आजारी पडत आहेत
अहवालानुसार उंदीर सर्वत्र आढळत आहेत. ते शेतात, घरे, छतावर, शाळा आणि रुग्णालयांना फर्निचरमध्ये आढळत आहेत. यामुळे लोक त्रस्त आहेत. बरेच लोक यापासून आजारी पडल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत.