Pegasus Spyware : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेवर पेगॅससची पाळत
देशाच्या तत्कालीन सरन्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर संबंधित महिलेला पेगॅसस स्पायवेअरच्या लिस्ट मध्ये टाकण्यात आल्याचं वृत्त फ्रान्सच्या एका माध्यमाने दिलं आहे.
नवी दिल्ली : पेगॅसस स्पायवेअरच्या हेरगिरीच्या प्रकरणातून अनेक धक्कादायक बातम्या बाहेर येत आहेत. देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेवर, तिच्या कार्यालयातील तीन मोबाईल नंबरवर आणि त्या महिलेच्या नातेवाईकांवर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवल्याची माहिती समोर आली आहे असं द वायर ने आपल्या वृत्तात सांगितलं आहे. इस्त्रायलच्या कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती यांच्यावर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे.
त्या महिलेला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं
देशाच्या तत्कालीन सरन्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर संबंधित महिलेला पेगॅसस स्पायवेअरच्या लिस्ट मध्ये टाकण्यात आल्याचं वृत्त फ्रान्सच्या एका माध्यमाने दिलं आहे. या महिलेच्या कार्यालयातील तीन स्टाफ, महिलेचा पती आणि तिच्या जवळच्या इतर सात नातेवाईकांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली होती.
पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून ज्या लोकांवर पाळत ठेवण्यात आली होती त्या लोकांची यादी फ्रान्सच्या एका माध्यमाच्या हाती लागली आहे. त्यामध्ये माजी सरन्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या महिलेची आणि तिच्याशी संबंधित 11 लोकांचे नाव समाविष्ट असल्याचं समोर आलं आहे.
या महिलेने माजी सरन्यायाधीशांवर केलेले आरोप हे गंभीर असले तरी त्यामुळे देशाच्या सुरक्षेला कोणता धोका होता किंवा कोणती नॅशनल इमर्जन्सी होती हे समजायला काही मार्ग नसल्याचं मत अनेकानी व्यक्त केलंय.
पीडित महिलेचा आरोप
माजी सरन्यायाधीशांनी मदत करण्याच्या बदल्यात शारीरिक सुखाची मागणी केला असल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. त्यांच्या मागणीला विरोध केल्यानंतर आपली काही आठवड्यातच तीन वेळा बदली करण्यात आल्याचंही त्या महिलेने सांगितलं होतं. शेवटी आपल्याला नोकरीवरुन कमी करण्यात आल्याचंही तिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं. त्या महिलेच्या पतीच्या एका भावालाही न्यायालयातील नोकरीवरुन कोणतेही स्पष्टीकरण न देता काढून टाकण्यात आलं होतं.
नोकरीवरुन कमी केल्यानंतर आपल्याला दिल्ली पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली त्रास दिल्याचा आरोपही तिने केला होता. त्याच वेळी ज्या व्यक्तीची आपण कधीच भेट घेतली नाही अशा व्यक्तीने आपल्यावर लाच घेतल्याचा आरोप केला आणि या प्रकरणात आपल्याला तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोपही या महिलेने केला होता. आपल्या परिवारावर पाळत ठेवणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी तुरुंगात असताना दोन पोलिसांनी आपल्याला त्रास दिल्याचंही या महिलेनं सांगितलं होतं.
सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन वरिष्ठ न्यायाधीशांची एक समिती नेमण्यात आली होती. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं या समितीच्या अहवालात सांगण्यात आलं होतं.
समितीच्या या अहवालावर या महिलेने नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून असलेली न्यायाची अपेक्षा संपुष्टात आल्याची भावना तिने व्यक्त केली होती.
राहुल गांधी, प्रशांत किशोर आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांवरही पाळत
पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यामातून केंद्र सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रननितीकार प्रशांत किशोर, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सध्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांच्यावरही पाळत ठेवल्याचं फ्रान्सच्या माध्यमाने स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pegasus Spyware : काय आहे पेगॅसस स्पायवेअर? ते तुमचे व्हॉट्सअॅप कसे हॅक करु शकते?
- Pegasus Spying: 'भारतात कुणाचीही हेरगिरी नाही, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित', भारत सरकारचं स्पष्टीकरण
- Pegasus Spyware : पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन राजकीय रणकंदन सुरु; विरोधकांची सकाळी तर पंतप्रधानांची संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक