Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सलग दहाव्या दिवशीही कायम
संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. दहा दिवसांपासून कामकाज होत नाहीय. आज पुन्हा एकदा पेगासिस मुद्द्यावरुन विरोधकांनी एकत्रित होत संसदेचं सभागृह दणाणून सोडलं.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सलग दहाव्या दिवशीही कायम आहे. आज पेगॅसिस मुद्द्यावरुन विरोधकांनी एकत्रित रणनीती आखत सभागृह दणाणून सोडलं. त्यामुळे संसदेतला आजचा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. दहा दिवसांपासून कामकाज होत नाहीय. आज पुन्हा एकदा पेगासिस मुद्द्यावरुन विरोधकांनी एकत्रित होत संसदेचं सभागृह दणाणून सोडलं. लोकसभेत आज काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी कागद भिरकावले तर तृणमूल काँग्रेस खासदारांकडून सभागृहात खेला होबेच्या घोषणाही ऐकू आल्या.
आज सकाळीच विरोधकांच्या या हालचालीची चाहूल सुरु झाली. संसद परिसरात विरोधकांनी एकत्रित बैठक आयोजित केली. या बैठकीला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही उपस्थिती होती. 14 पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती या बैठकीला होती. ज्यात शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत ठरेलल्या रणनीतीचे पडसाद सभागृह सुरु झाल्यावर लगेच दिसले आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. सदनाच्या बाहेर येऊन एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर तोफ डागली. पेगासिसची पाळत हा प्रायव्हसीचा विषय नाही तर देशाशी धोका असल्याची टीका राहुल गांधींनी केली. काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावत शिवसेनाही या विरोधात सहभागी झाली आणि विरोधकांची एकजूट कायम राहणार असल्याचा इशारा दिला.
19 जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु झालंय. पण राज्यसभेत कोरोनाच्या विषयावरची चर्चा सोडली तर दुसऱ्या कुठल्याच मुद्यावर अजून चर्चा झालेली नाहीय. सरकार बैठकीत सर्व मुद्दयांवर चर्चा करु असं म्हणतंय पण प्रत्यक्षात पेगॅसिसवर चर्चेसाठी तयार नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे.अधिवेशन सुरु होण्याआधी कोरोनाची दुसरी लाट, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्दयांची चर्चा होती. अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅसिस प्रोजेक्टचा गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला. त्यानंतर हाच मुद्दा आता अधिवेशनात प्रभावी होताना दिसतोय. या मुद्दयावर आता सभागृहात सरकार चर्चेला तयार होतं का आणि त्यावरुन विरोधकांची रणनीती काय राहते हे पाहणं महत्वाचं असेल.