पाकिस्तानकडून कराचीचा हवाई मार्ग वाहतुकीसाठी 31 ऑगस्टपर्यंत बंद
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठीची कराचीची हवाई हद्द बंद केली आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठीची कराचीची हवाई हद्द बंद केली आहे. आजपासून 31 ऑगस्टपर्यंत कराचीचा हवाई मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याची सूचना पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे.
आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही 3 दिवसांसाठी पाकिस्तानातील कराची हवाईमार्ग टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवाई मार्ग बंद करण्यामागे कुठलंही कारण पाकिस्तानकडून देण्यात आलेलं नाही.
कालच पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी भारतासाठी पाक हवाई हद्द बंद करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं होतं. याआधी बालाकोट एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली होती.
Pakistan: Karachi airspace partially shut till August 31
Read @ANI story | https://t.co/O1QlkjJECn pic.twitter.com/XjkL9OCIjm — ANI Digital (@ani_digital) August 28, 2019
फवाद चौधरी यांनी काय म्हटलं होतं?
पंतप्रधान इम्रान खान भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आहेत. अफगाणिस्तानसोबतच्या व्यापारासाठी भारत पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करतो. ही हद्द पूर्णपणे बंद करण्याचा विचार सुरु आहे. कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतच्या कायदेशीर प्रकियेवर विचारविनीमय सुरु आहे. मोदींनी हे सुरु केलं आहे, आम्ही हे संपवू, असा इशारा फवाद चौधरी यांनी दिला होता.
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती. त्यानंतर 27 मार्चला पाकिस्तानने दिल्ली, बँकॉक आणि क्वालालंपूर व्यतिरिक्त सर्व उड्डानांसाठी आपली ही हवाई हद्द सुरु केली होती.
भारतासोबतचे व्यापारी संबधही तोडले
काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं होतं. याशिवाय पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही परत बोलावण्याच्या निर्णय घेतला होता. या सर्व निर्णयांचा पाकिस्तानमधील जनतेला मोठा फटका बसत आहे.
संबंधित बातम्या