Pahalgam Terror Attack : भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानचेही उत्तर, व्यापार बंदीची घोषणा, पाच घोषणा केल्या
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानने भारतासोबत असलेला व्यापार बंद करण्याचा निर्यण घेतला आहे. तसेच भारतीय विमानांसाठी हवाईमार्गही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पाच मोठे निर्णय जाहीर केल्यानंतर आता पाकिस्तानची चांगलीच पंचायत होत असल्याचं चित्र आहे. भारताच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. सर्व भारतीय मालकीच्या किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्यावर पाकिस्ताननेही भारताविरोधात सहा निर्णय घेतले आहेत.
पाकिस्तानने कोणते निर्णय घेतले?
- भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही
- भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार.
- भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावं लागणार.
- वाघा अटारी बॉर्डर बंद.
- इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30वर आणणार.
- भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद.
पाकिस्तानविरुद्ध भारताचे तगडे निर्णय
- सिंधू पाणी करार स्थगित .
- पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद .
- पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश.
- अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार .
- भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद .
मोदींचा दहशतवाद्यांना इशारा
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा जाहीर भाष्य केलं. हा हल्ला करून भारतीय आत्म्यावरच हल्ला करण्याचं दुःसाहस करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार दणका मिळेल, कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देण्यात येईल असं मोदींनी ठणकावलं. बिहारच्या मधुबनी इथे सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी ही गर्जना केली. दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रयस्थानंही नष्ट करण्याची वेळ आली आहे असं मोदी म्हणाले.























