Pahalgam Terror Attack : पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय नौदलाकडून पाकिस्तानची झोप उडवणारी पोस्ट; म्हणाले, कुठेही, कधीही...
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. आता भारतीय नौदलाने शेअर केलेली पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताने केवळ कडक राजनैतिक पावले उचलली नाहीत तर आपल्या लष्करी सामर्थ्याचे देखील प्रदर्शन केले आहे.
आता भारतीय नौदलाने २६ एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर समुद्रात एकत्र गस्त घालणाऱ्या पाच युद्धनौकांचा फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रातून एक स्पष्ट संदेश देण्यात आला की, भारतीय नौदल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेहमीच तयार आहे. पोस्टमध्ये "एकतेतील ताकद; उद्देशपूर्ण उपस्थिती" असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे. तर #MissionReady आणि #AnytimeAnywhereAnyhow सारखे हॅशटॅग देखील वापरण्यात आले आहे. भारतीय नौदलाची पोस्ट सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Power in unity; Presence with Purpose
— IN (@IndiannavyMedia) April 26, 2025
#MissionReady#AnytimeAnywhereAnyhow pic.twitter.com/EOlQFyXFgJ
पाकिस्तानविरुद्ध भारताने उचलले कठोर पावले
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे सिंधू नदी पाणी कराराला स्थगिती आणि अटारी सीमा चौकी बंद करणे. तर पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा आणि ते युद्धाचे कृत्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर भारताने केवळ लष्करी पातळीवर तयारी वाढवली नाही तर राजनैतिक पातळीवरही पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली. या संदर्भात, भारतीय नौदलाने आयएनएस सुरत येथून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, जी त्यांची उच्च ऑपरेशनल तयारी दाखवत आहे.
भारतीय नौदल आणि पाकिस्तानी नौदलाची तुलना
आपण भारतीय नौदल आणि पाकिस्तानी नौदलाच्या ताकदीची तुलना केली तर भारतीय नौदल स्पष्टपणे खूप पुढे आहे. भारतीय नौदलाकडे 293 जहाजे आहेत, ज्यात दोन विमानवाहू जहाजे, आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत यांचा समावेश आहे. भारताकडे 16 पारंपारिक पाणबुड्या, आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाट या दोन अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आहेत. त्या तुलनेत, पाकिस्तानकडे फक्त 121 जहाजे आहेत आणि त्यांच्याकडे एकही विमानवाहू नौका नाही. पाकिस्तानकडे आठ पाणबुड्या आहेत, त्यापैकी बहुतेक जुन्या अगोस्टा वर्गाच्या आणि काही नवीन हेंगशेंग वर्गाच्या पाणबुड्या आहेत. ज्या पाकिस्तानने चीनकडून विकत घेतल्या आहेत आणि अद्याप त्या पूर्णपणे कार्यरत नाहीत.
आणखी वाचा























