Pahalgam Terror Attack : भारताचं पुढचं पाऊल, अमेरिका, चीन, रशिया, कॅनडासह विविध देशाच्या दूतावासांना बोलावलं, युद्ध घोषणेच्या दिशेने वाटचाल?
Pahalgam Terror Attack : एकीकडे भारताने इतर देशांच्या राजदूतांना आपल्या भूमिकेची माहिती देणं सुरू केलं आहे तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) आता भारताने आक्रमक भूमिका घेतली असून पाकिस्तानची (Pakistan) सर्व बाजूने कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताने आता एक पाऊल पुढे टाकलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केला आहेत. परराष्ट्र खात्याने अमेरिका (US Ambassador), चीन, रशिया, कॅनडा, इंग्लंडसह विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू केली आहे. यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे युद्धाच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.
दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये (Delhi South Block Meeting) परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेची माहिती या राजदूतांना देण्यात येत आहे.
Amit Shah Meet President : अमित शाह आणि जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला
दरम्यान, दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा बंदी केली आहे. तसेचे 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेशही दिले आहेत. एकीकडे या गोष्टी घडत असतानाच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. यावेळी अमित शाहांच्या हातामध्ये दोन लाल फाईल्स होत्या. त्यामुळे भारताची वाटचाल ही युद्ध घोषणेच्या दिशेने सुरू आहे का अशी चर्चाही यावेळी केली जात आहे.
Union Minister for Home Affairs and Cooperation, Shri Amit Shah and Minister of External Affairs, Dr S Jaishankar called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/pk6XQFeHc5
— President of India (@rashtrapatibhvn) April 24, 2025
Narendra Modi Warning To Pakistan : मोदींचा दहशतवाद्यांना इशारा
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा जाहीर भाष्य केलं. हा हल्ला करून भारतीय आत्म्यावरच हल्ला करण्याचं दुःसाहस करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार दणका मिळेल, कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देण्यात येईल असं मोदींनी ठणकावलं. बिहारच्या मधुबनी इथे सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी ही गर्जना केली. दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रयस्थानंही नष्ट करण्याची वेळ आली आहे असं मोदी म्हणाले.
Pakistan Share Market Crash : पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला
भारतानं बुधवारी पाकिस्तानविरोधात महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्याचा थेट परिणाम गुरुवारी कराची स्टॉक एक्सचेंजवर दिसून आला. मार्केट उघडताच केएसई 100 हा इंडेक्स अडीच हजार अंक, अर्थात दोन टक्क्यांनी कोसळला. गुंतवणूकदारांना पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची चिंता वाटतेय, भारत पुढे काय पाऊलं उचलेल याची भीती या गुंतवणूकदारांना देखील आहे हेच यावरून अधोरेखित होतं.























