Meena Harris: भारतातील लोकशाही धोक्यात असल्याच्या मीना हॅरिस यांच्या मतावर व्हाईट हाऊस नाराज
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या भाची मीना हॅरिस (Meena Harris) यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या (farmers' protest) समर्थनार्थ भूमिका घेतली होती. भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.
नवी दिल्ली: मीना हॅरिस यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं, तसेच भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचंही मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर व्हाईट हाऊसने नाराजी व्यक्त केली आहे. मीना हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाची आहेत.
अमेरिकन लॉस एन्जलिस टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या एका बातमीनुसार अमेरिकन राष्ट्रपती कार्यालयाने मीना हॅरिस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या वैयक्तिक मतांसाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नावाचा वापर करु नये अशीही सूचना दिल्याचं या वृत्तपत्राने नमूद केलं आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर जगभरातून अनेक महत्वाच्या व्यक्तींनी भाष्य केलं होतं. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनीही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. केवळ एकढ्यावरच त्या थांबल्या नव्हत्या तर त्यांनी भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचं सांगितलं होतं.
कमला हॅरिस यांची भाची असल्याने मीना यांच्या या मताला महत्व प्राप्त झालं होतं. मीना हॅरिस यांचं मत हे कमला हॅरिस यांचे आहे का असाही प्रश्न विचारला जात होता.
अमेरिकेचे राष्ट्रपती कार्यालय मीना हॅरिस यांच्या या मताशी सहमत नसल्याचं समजतंय. तसेच कार्यालयाने मीना हॅरिस यांना कमला हॅरिस यांच्या नावाचा वापर करु नये असंही सांगितल्याची चर्चा आहे.
काय म्हणाल्या होत्या मीना हॅरिस? दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करताना मीना हॅरिस म्हणाल्या होत्या की, "हा काही योगायोग नाही की जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर महिन्यापूर्वी हल्ला करण्यात आला होता आणि आता जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत. यावरुन आपण क्रोधीत व्हायला हवं."
It’s no coincidence that the world’s oldest democracy was attacked not even a month ago, and as we speak, the most populous democracy is under assault. This is related. We ALL should be outraged by India’s internet shutdowns and paramilitary violence against farmer protesters. https://t.co/yIvCWYQDD1 pic.twitter.com/DxWWhkemxW
— Meena Harris (@meenaharris) February 2, 2021
त्या पुढे म्हणाल्या की, "अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर हल्ला झाल्यानंतर आपण जशी प्रतिक्रिया दिली होती त्याच प्रकारची प्रतिक्रिया आता आपण दिली पाहिजे. फॅसिवाद जगासाठी कायमच धोक्याचा आहे. ट्रम्प यांचा कार्यकाल भलेही संपला असेल, पण आपल्या आजूबाजूला तशा प्रकारचं वातावरण आहे."
मीना हॅरिस यांनी पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीच्या अटकेवरुन भारत सरकारवर अनेकदा टीका केली आहे.
Toolkit Case: दिशा रवीच्या अटकेनंतर चर्चेत आलेले टूलकिट काय आहे? ते कशा प्रकारे काम करतं?