Toolkit Case: दिशा रवीच्या अटकेनंतर चर्चेत आलेले टूलकिट काय आहे? ते कशा प्रकारे काम करतं?
टूलकिट (toolkit) हे एक असं डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला (Protest) हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते.अमेरिकेतील 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' या आंदोलनात टूलकिट पहिल्यांदा चर्चेत आलं होतं.

नवी दिल्ली: पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली शेतकरी आंदोलनाशी संबंधी एक टूलकिट शेअर केलं होतं. या टूलकिटमध्ये खलिस्तानवादी अॅंगल असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात रविवारी बेंगळुरुतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आली आहे.
ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट खलिस्तानवादी समर्थकांनी तयार केलं आहे असा संशय व्यक्त करत त्या टूलकिटवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरु केला असून त्या संबंधी दिशा रवी या 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. दिशा रवीने हे टूलकिट तयार करण्यात आणि ते फॉरवर्ड करण्यात महत्वाची भूमिका बजावली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या संबंधी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केलाय.
या टूलकिट तपासाच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी लोकांची नेमकी काय भूमिका आहे याचा तपास सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिशा रवीला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे.
कोण आहे दिशा रवी? खलिस्तानवादी समर्थक संघटना असलेल्या पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या मदतीने दिशा रवी देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिशा रवी ही बेंगळुरुतील माउंट कार्मेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून ती पर्यावरण चळवळीत सक्रिय आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या मोहीमेची सह-संस्थापक आहे. 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या मोहीमेच्या माध्यमातून पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली होती. या मोहीमेच्या माध्यमातून जगभरातील पर्यावरणच्या प्रश्नावर आवाज उठवला जातोय.
ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण, बंगळुरुतील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी अटकेत
काय आहे टूलकिट वाद? दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून ग्रेटा थनबर्गने एक ट्वीट केलं होतं. त्यासोबत एक टूलकिट शेअर केलं होतं. त्या टूलकिटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलन कशा प्रकारे करण्यात यावं याची माहिती देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विस्तार कशा पद्धतीने करायचा, काय पाऊले उचलायची याची सखोल माहिती या टूलकिटमध्ये देण्यात आली होती. शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट करताना कोणता हॅशटॅग वापरायचा, काय ट्वीट करायचं तसंच सरकारच्या कारवाईपासून कसा बचाव करायचा याची सखोल माहितीही देण्यात आली होती. नंतर यावरुन वाद झाल्याने ग्रेटा थनबर्गने ते टूलकिट डिलीट केलं.
हे टूलकिट खालिस्तानवादी समर्थकांकडून तयार करण्यात आलं आहे असा संशय व्यक्त करुन दिल्ली पोलिसांनी त्या संबंधी गुन्हा नोंद केला होता. आता शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी अॅंगलने याचा तपास करण्यात येतोय.
काय आहे टूलकिट ? टूलकिट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. अमेरिकेतील 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' या आंदोलनात अशा प्रकारचं टूलकिट पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते.
आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावं, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते.
ग्रेटा थनबर्गने अपलोड केलेल्या टूलकिटबाबत दिल्लीत गुन्हा दाखल






















