Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडू: अण्णाद्रमुक पक्ष कोणाचा? हायकोर्टाच्या निर्णयाने मोठा उलटफेर
Tamilnadu OPS vs EPS : अण्णाद्रमुक पक्षातील सुंदोपसुंदी अजूनही संपुष्टात येण्याची चिन्हं नाहीत. मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाने मोठा उलटफेर झाला आहे.
Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पश्चात अण्णाद्रमुक पक्ष कोणाचा हे वाद संपण्याची चिन्ह नाहीत. अण्णाद्रमुक पक्षाच्या नेतृत्वावरून ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्या वादात हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मद्रास हायकोर्टाने पलानीस्वामी यांच्या बाजूने निकाल देत पन्नीरसेल्वम यांच्या बाजूने दिलेला निर्णय रद्द केला. त्यामुळे पलानीस्वामी यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.
मद्रास हायकोर्टाने न्या. एम. दुरईस्वामी आणि न्या. सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने याआधी एकसदस्यीय खंडपीठाने दिलेला निर्णय रद्द केला. एकसदस्यीय खंडपीठाने अण्णाद्रमुक पक्षाची 11 जुलै रोजी झालेली सर्वसाधारण बैठक बेकायदा असल्याचा निकाल देत त्यातील निर्णय रद्द केले होते. या बैठकीत पलानीस्वामी यांची पक्षाचे अंतरिम महासचिव म्हणून निवड करण्यात आली होती. तर, पन्नीरसेल्वम यांना हटवण्यात आले होते.
मद्रास हायकोर्टाच्या निकालानंतर आता पलानीस्वामी हे अण्णाद्रमुक पक्षाचे एकमेव सर्वोच्च नेते असणार आहेत. पन्नीरसेल्वम यांच्याकडून मद्रास हायकोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
प्रकरण काय?
ओ. पन्नीरसेल्वम हे अण्णाद्रमुकच्या दिवगंत जयललिता यांचे निकटवर्तीय समजले जातात. जयललिता यांना विविध गुन्ह्यात दोषी आढळल्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यावेळी पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली होती. जयललिता यांच्या निधनानंतरही पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते. त्यावेळी ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते.
जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले आणि ई. पलानीस्वामी यांच्याकडे धुरा सोपवली. त्यानंतर शशीकला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. या दरम्यान, दोन्ही गटात दिलजमाई झाली. त्यानंतर शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त नेतृत्वावर सहमती दर्शवली होती. ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री असताना त्यांनी संघटनेवरही पकड मजबूत केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये पक्षावरील वर्चस्वाच्या मुद्यावरून वाद सुरू आहेत.
पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्यात झालेल्या दिलजमाईनुसार, अण्णाद्रमुक पक्षात समन्वयक आणि सह-समन्वयक अशी पदे तयार करून ओ. पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांची निवड करण्यात आली. जयकुमार यांच्या मागणीनंतर पक्षाच्या जनरल कौन्सिलची बैठक बोलावण्यात आली. या कौन्सिलच्या बैठकीत ई. पलानीस्वामी यांच्या समर्थकांची संख्या अधिक होती असे म्हटले जाते. त्यानंतर पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी गटात वाद निर्माण झाला. या बैठकीत पलानीस्वामी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तर, ओ. पन्नीरसेल्वम यांचे पंख छाटण्यात आले. त्यानंतर पक्षांतर्गत वाद कोर्टात गेला.