(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडू: पन्नीरसेल्वम यांना मद्रास हायकोर्टाचा मोठा दिलासा, पक्ष प्रमुखपदावरुन पलानीस्वामी नियुक्ती रद्द
Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षातील गटबाजीवर मद्रास हायकोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले असून ई. पन्नीरसेल्वम यांना दिलासा दिला आहे.
Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडूतील विरोधी पक्षात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षातील गटबाजीच्या (AIDMK) मुद्यावरून मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मद्रास हायकोर्टाने ओ. पन्नीरसेल्वम (OPS) यांना दिलासा असून पक्षाच्या महासचिवपदावर असलेले पलानीस्वामी (EPS) यांची नियुक्ती रद्द केली आहे. त्याशिवाय, अण्णाद्रमुक पक्षाने मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयावरही स्थगिती दिली आहे.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते ओ. पन्नीरसेल्वम यांची ई. पलानीस्वामी गटाकडून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर पलानीस्वामी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मद्रास हायकोर्टाने या निर्णयालाही स्थगिती दिली आहे. अण्णाद्रमुक पक्षाची बैठक ही समन्वयक आणि संयुक्त समन्वयकांनी बोलावणे गरजेचे होते. ई. पलानीस्वामी यांची या सर्वसाधारण बैठकीने महासचिवपदी नियुक्ती वैध नसल्याचे कोर्टाने म्हटले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयकुमार यांनी म्हटले की, कोर्टाने अजून अंतिम आदेश दिला नाही. आम्ही याबाबत आमच्या ज्येष्ठ वकिलांसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत. पक्षाची जनरल कौन्सिलची बैठक अंतिम निर्णय घेणारी सर्वोच्च घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
डी. जयकुमार यांनी पक्षात दुहेरी नेतृत्वाऐवजी एकच नेतृत्व असावे अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर अण्णाद्रमुक पक्षात मोठा वाद निर्माण झाला. सध्या अण्णाद्रमुक पक्षात समन्वयक आणि सह-समन्वयक अशी पदे असून यावर ओ. पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांची निवड करण्यात आली. जयकुमार यांच्या मागणीनंतर पक्षाच्या जनरल कौन्सिलची बैठक बोलावण्यात आली. या कौन्सिलच्या बैठकीत ई. पलानीस्वामी यांच्या समर्थकांची संख्या अधिक होती असे म्हटले जाते. त्यानंतर पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी गटात वाद निर्माण झाला. या बैठकीत पलानीस्वामी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तर, ओ. पन्नीरसेल्वम यांचे पंख छाटण्यात आले. याविरोधात पन्नीरसेल्वम गटाने मद्रास हायकोर्टात धाव घेतली.
ओ. पन्नीरसेल्वम हे अण्णाद्रमुकच्या दिवगंत जयललिता यांचे निकटवर्तीय समजले जाते. जयललिता यांना विविध गुन्ह्यात दोषी आढळल्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यावेळी पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली होती. जयललिता यांच्या निधनानंतरही पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते. त्यावेळी ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते.
जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले आणि ई. पलानीस्वामी यांच्याकडे धुरा सोपवली. त्यानंतर शशीकला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. या दरम्यान, दोन्ही गटात दिलजमाई झाली. त्यानंतर शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त नेतृत्वावर सहमती दर्शवली होती. ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री असताना त्यांनी संघटनेवरही पकड मजबूत केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये पक्षावरील वर्चस्वाच्या मुद्यावरून वाद सुरू आहेत.