Operation Sindoor 'रॉ'ने दिले इनपूट, भारतीय वायूसेनेकडून दणक्यात टार्गेट; ऑपरेशन सिंदूरची 'इनसाईड स्टोरी'
Operation Sindoor भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सीमारेषेच्या हद्दीत न जाताच पाकव्याप्त काश्मिरातील 5 आणि पाकिस्तानातले 4 दहशतवादी तळ भारताने बेचिराख केले.

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने अखेर घेतलाच. एकीकडे देशभरात मॉकड्रीलची तयारी सुरू असताना मध्यरात्री भारताने पाकिस्तानमध्ये (Pakistan) लपलेल्या दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करत 9 ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या (Terrorist) अड्ड्यांना उध्वस्त केलं आहे. ऑपरेशन सिंदूर नावाने भारतीय सैन्य दलाच्या तिनही दलांनी ही कामगिरी बजावली असून देशभरात आज भारत माता की जय आणि जय हिंदची घोषणाबाजी होत आहे. तर, भारताने पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam) निष्पाप नागरिकांच्या मृत्युचा बदला घेतल्याने पीडित कुटुंबीयांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे आजच्या या हल्ल्याच्या योजनेत भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ची भूमिकाही तितकीच महत्त्वाची राहिली आहे.
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सीमारेषेच्या हद्दीत न जाताच पाकव्याप्त काश्मिरातील 5 आणि पाकिस्तानातले 4 दहशतवादी तळ भारताने बेचिराख केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार भारतीय वायू दलाने ऑपरेशन सिंदूर असे या मोहिमेचं नाव ठेवलं होतं. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 'रॉ' ने या ठिकाणांचे टार्गेट ठरवले होते.
पाकिस्तानमधील या दहशतवादी तळांची माहिती भारताची गुप्तचर संघटना म्हणजेच 'रॉ' कडूनच भारतीय सैन्य दलास प्राप्त झाली. आजच्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोएबा, जैश ए मोहम्मद इत्यादींच्या ठिकणांवर तातडीने क्षेपणास्त्र फेकण्यात आले होते. भारतीय वायू सेनेच्या विमानांनी काही मिनिटांतच ही ठिकाणे नेस्तनाबूत केली आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील या तळांवर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयमधील अधिकाऱ्यांचे येणे-जाणे देखील होते, अशी माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'-
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तथापि, हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.
असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून हल्ल्याचे स्वागत
भारतीय सैन्य दलाच्या कारवाईनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचे स्वागत केले आहे. पाकिस्तानला अशाच प्रकारच्या भाषेत ताकीद द्यायला हवी होती. त्यामुळे, पुन्हा कधी पहलगाम होणार नाही. पाकिस्तानचा दहशवादी पाया कायमचा नेस्तनाबूत केला पाहिजे, जय हिंद असे ओवैसी यांनी म्हटलं आहे.
मसूद अझहरच्या भाऊ, बहिणीसह 14 जणांचा मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केलं आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्यावची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर























