Operation Sindoor : पाकिस्तानला तर झोडपलं, आता त्याला साथ देणाऱ्या 'मित्रां'चा कार्यक्रम कधी?
India Pakistan Tension : भारताच्या विरोधात पाकिस्तानला तुर्कस्तान आणि अझरबैजानने उघड पाठिंबा दिला. तर चीनसह काही देशांनी पाकिस्तानच्या मागे छुपी ताकद उभी केल्याचं चित्र आहे.

मुंबई : भारताशी झालेल्या संघर्षात पाकच्या कुटील डावाला तुर्की, चीनसारख्या देशांची साथ मिळाली. त्यांच्याकडून मिळालेल्या संरक्षण यंत्रणेच्या बळावर भारताला भिडण्याचं धाडस पाकने केलं. अर्थात या यंत्रणेला भारताने कुचकामी ठरवलंच. आता पाकच्या या कावेबाज मित्रांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी भारताला प्लॅनिंग करावं लागणार आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पडला. पाकिस्तानच्या एअर डिफेन्समधली भगदाडं उघडी पडली. पाकिस्तानच्या न्युक्लिअर युद्धाच्या धमकीतील फोलपणा उघडा पडला आणि उघडा पडला तो प्रत्येक देश, ज्याने दहशतवादी पाकिस्तानला भारताविरोधात मदत केली. या देशांमध्ये सर्वात मोठं नाव अर्थातच चीन आणि त्यानंतर तुर्कस्तान.
Turkey Backs Pakistan Against India : तुर्कस्तानची पाकिस्तानला साथ
पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कस्तान पाकिस्तानसोबत ठामपणे उभा राहिला. तुर्कस्तानला आशियातील इस्लामी देशांचा नेता बनायचं आहे. त्यासाठी त्या देशाचे अध्यक्ष एर्दोगान पाकिस्तान, मलेशिया अशा देशांची मोट बांधत आहे. तुर्कस्तानने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दशकात या दोन्ही देशात लष्करी देवाणघेवाण वाढली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने जे ड्रोन पाठवले होते ते तुर्कस्तानचे होते. भारताने त्या ड्रोनचे हवेतच तुकडे केले हा भाग वेगळा.
China Supports Pakistan : चीनकडून मोठा फायदा
चीन खालोखाल पाकिस्तानला तुर्कस्तान लष्करी मदत करतो किंवा अझरबैजान मदत करतो असा अनेकांचा समज आहे. पण चीनखालोखाल पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाचं नाव आहे नेदरलँड. सागरी युद्धासाठी तो पाकिस्तानला नेहमीच मदत करत आला आहे. दोनच महिन्यांपूर्वी भारताने नेदरलँड्सला याबाबत चेतावणी सुद्धा दिली होती.
गेल्या दहा-बारा वर्षात नेदरलँड्सने पाकला हजार-दीड हजार कोटी रुपयांचं लष्करी साहित्य निर्यात केलं आहे. नेदरलँड्सच्या संरक्षणमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांनी पाकची जिहादी नीती समजून सांगितली होती. हजार बाराशे कोटी आकडा छोटा वाटत असला तरी पाकला वातावरण अस्थिर करायला तो पुरेसा आहे.
Pakistan Import : पाकच्या लष्करी आयातीत कोणाचा वाटा?
- चीन - 81 टक्के
- नेदरलँन्ड्स- 5.5 टक्के
- तुर्कस्तान - 3.8 टक्के
US Pakistan Relation : अमेरिका पाकिस्तानला पाठीशी घालतोय?
एक गोष्ट विसरुन चालणार नाही आणि ती म्हणजे अमेरिका दीर्घ काळ पाकिस्तानचा वापर करत आला आहे. कुख्यात जिहादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडेपर्यंत पाकिस्तान अमेरिकेच्या मित्र यादीतच होता. त्या बदल्यात प्रचंड म्हणजे अब्जावधी डॉलर्सची आर्थिक मदत आणि तंत्रज्ञान पुरवत आला आहे. त्याचा वापर पाकिस्तानने भारतविरोधी दहशतवादासाठी केला आहे.
ज्या एफ-16 चा सतत उल्लेख होतो, ती अमेरिकेचीच देण आहे हे विसरुन चालणार नाही. आम्हाला अमेरिकेनं वापरलं, इंग्लंडने वापरलं, पाश्चात्य देशांनी वापरलं हे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आंतरराष्ट्रीय चॅनलवर निर्लज्जपणे सांगतात ते याच कारणामुळे.
दहशतवादी पाकिस्तान रोग नेशन म्हणून कुप्रसिद्ध आहे. तो कधी कोणाच्या मित्र यादीत असेल सांगता येत नाही. त्यामुळे भारताने आपले मित्र यादी सतत चेक करत राहणे आणि अपग्रेड करत राहणे महत्त्वाचं राहणार आहे. पाकिस्तान आणि त्याच्या स्वार्थी मित्रांना कसा धडा शिकवायचा याचा वेगळं नियोजन भारताला करावं लागणार आहे.























