....तर थांबवता आला असता रेल्वेचा अपघात? रेल्वेची सुरक्षा प्रणाली 'कवच'चे काय झालं?
Odisha Train Accident: बालारोसमध्ये झालेल्या रेल्वे अपघतात आतापर्यंत 261 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. पंरतु रेल्वेचा हा अपघात थांबवता आला असता का असा सवाल करण्यात आता उपस्थित करण्यात येत आहे.
Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Railway Accident) अनेक लोक गंभीर जखमी झाले तर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. ओडिशामध्ये तीन गाड्यांचा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला. त्यानंतर रेल्वेकडून बचावकार्य देखील सुरु करण्यात आले. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे तो म्हणजे हा अपघात टाळाता आला असता का?
भारतातील रेल्वेचं विस्तृत जाळं पाहता रेल्वे अपघाताच्या घटना काही नवीन नाहीत. याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्याचे परिणाम देखील तितकेच गंभीर झाले आहेत. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेमध्ये कवच नवाच्या प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रणालीची काहीच दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे आता या प्रणालीचे काय झाले? हा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.
नेमकं काय आहे हे 'कवच'?
कवच हा प्रकल्प रेल्वेकडून सुरु करण्यात आला आहे. अपघात टाळण्यासाठी रेल्वेकडून या प्रणालीचा वापर करण्यात येणा आहे. परंतु या प्रणालीला अजून तरी रेल्वेच्या सर्व मार्गांवर जोडण्यात आले नाही. या प्रणालीमुळे एकाच ट्रॅकवर असलेल्या दोन ट्रेन समोरासमोर आल्यास स्वत:हून थांबतील. भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन अॅन्ड स्टँडर्ड ऑर्गनायजेशन अंतर्गत ही प्रणाली विकसित केली आहे. रेल्वेने 2012 पासून ही प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली होती.
या प्रणालीमुळे रेल्वेकडून अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला दिसत होतं. तसेच या प्रणालीची पहिली चाचणी 2016 मध्ये घेण्यात आली होती. तर मागील वर्षी या प्रणालीचा लाइव्ह चाचणी घेतली. ही प्रणाली अनेक उपकराणांनी बनवण्यात आली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या एक किलोमीटर अंतरावर ही प्रणाली बसवली जाऊ शकते.
कसं काम करते ही प्रणाली?
या प्रणालीमध्ये अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे नियंत्रण ठेवण्यात येते. जेव्हा एखादा लोको पायलट कोणता सिग्नल तोडतो तेव्हा ही कवच प्रणाली अॅक्टिव होते. त्यानंतर ही प्रणाली लोको पायलटला सतर्क करते आणि ट्रेनच्या ब्रेक्सवर नियंत्रण मिळवता येते. जसं या प्रणालीला कळतं या याच ट्रॅकवर दुसरी रेल्वे येत आहे तेव्हा ती आधीच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवते. या प्रणालीमुळे एकाच ट्रॅकवर असणाऱ्या दोन रेल्वेवर नियंत्रण मिळवण्यास शक्य होते. तसेच ठराविक अंतरावर दोन्ही रेल्वे या प्रणालीमुळे थांबतात. परंतु ही प्रणाली अजून सर्व रेल्वे मार्गांवर लावण्यात आलेली नाही. हळूहळू या प्रणालीला वेगवेगळ्या मार्गांवर लावण्यात येत आहे.
कसं निर्माण झालं हे 'कवच'?
रेल्वेकडून अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत असतात. याच पार्श्वभूमीवर 2002 पासून कोकण रेल्वेकडून 'रक्षा कवच' या प्रणालीचा वापर करण्यास सरुवात झाली. कोकण रेल्वेचे माजी प्रमुख राजाराम बोज्जी यांनी या प्रणालीची प्रथम सुरुवात केली. या प्रणाली अंतर्गत प्रत्येक रेल्वेमध्ये अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपकरण बसवले गेले. आजही अनेक रेल्वेमध्ये या जुन्या प्रणालीचा वापर करण्यात येतो. परंतु या प्रणालीमध्ये दर पाचवर्षांनी बदल करण्यात येतो आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जाते.
बंगालच्या मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'रेल्वेचे अपघात थांबण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली ही या दोन्ही रेल्वेमध्ये नव्हती' असा आरोप केला आहे. त्यामुळे आता या दोन्ही रेल्वेमध्ये हे उपकरण होतं की नव्हतं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.