केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्याप्रकरणी पर्यटक ताब्यात
आम्ही त्या गाडीस ओव्हरटेक केलं. आम्ही मंत्री प्रतापचंद्र सारंगी गाडीजवळ गेलो नाही. मंत्र्यांच्या गाडीला ओव्हरटेक करणे चुकीचे आहे हे मला माहिती नव्हते. असं शॉ यांनी सांगितलं.
भुवनेश्वर : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांची गाडी रविवारी एनएच -16 वर ओव्हरटेक केल्याप्रकरणी 6 पर्यटकांना ओडिशामध्ये ताब्यात घेण्यात आले. पुन्हा अशी चूक करणार नाही असं पर्यटकांकडून लिहून घेण्यात आलं आणि त्यानंतर या पर्यटकांना पोलिस स्टेशनमधून सोडण्यात आले. बालासोरच्या पंचलिंगेश्वरहून दोन गाड्यांमध्ये कोलकाताला येत असताना ही घटना घडली. संतोष शॉ, त्याची पत्नी, भाऊ आणि दोन अल्पवयीन मुले या गाड्यांमधून प्रवास करत होते.
शॉ यांनी याबाबत सांगितलं की, बस्ताजवळ एनएच -16 वर जात असताना आम्हाला सायरनचा आवाज ऐकू आला. आम्हाला वाटले की ही रुग्णवाहिका असू शकते आणि या गाडीला पुढे जाऊ दिले. मात्र नंतर आम्हाला समजले की मंत्र्यांची गाडी होती. ज्यांच्या संरक्षणात ही दुसरी गाडी होती. काही वेळाने,आम्ही त्या गाडीस ओव्हरटेक केलं. आम्ही मंत्र्यांच्या गाडीजवळ गेलो नाही. मंत्र्यांच्या गाडीला ओव्हरटेक करणे चुकीचे आहे हे मला माहिती नव्हते. असं शॉ यांनी सांगितलं.
पश्चिम बंगालच्या सीमेला लागून असलेल्या जलेश्वरच्या लोकनाथ टोल गेटपर्यंत मंत्र्यांच्या पायलट कारने दोन्ही गाड्यांचा पाठलाग केला. त्यानंतर या सर्वांना पाच तासासाठी ताब्यात घेण्यात आलं.
आढावा बैठकीसाठी केंद्रीय मंत्री बस्तामध्ये होते. आयआयसी बस्ता पोलिस स्टेशनचे अशोक नायक यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, दोन गाड्यांनी ओव्हरटेक केल्यानंतर मंत्र्यांनी पायलट गाडीला त्यांना पकडून परत आणण्यास सांगितले. पायलट कारने ती दोन्ही वाहने पकडली आणि त्यांना बस्ता पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पीआरवर सोडण्यात आलं. याव्यतिरिक्त, आपण पुन्हा अशी चूक करणार नाही याची लेखी ग्वाही त्यांनी दिली.