Odisha Stampede : आनंदावर विरजण! मकर संक्रांतीच्या जत्रेत चेंगराचेंगरी; एका महिलेचा मृत्यू तर अनेकजण जखमी, जमावबंदी लागू
Makar Sankranti Mela Stampede : ओदिशामध्ये मकर संक्रांतीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Odisha Makar Sankranti Mela Stampede : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी ओदिशामधून समोर येत आहे. मकर संक्रांतीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ओडिशामधील कटक येथील सिंहनाथ मंदिर परिसरात (Singhnath Temple) मकर संक्रांतीच्या जत्रेवेळी शनिवारी (14 जानेवारी) चेंगराचेंगरी झाली. यानंतर मंदिर परिसरात कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
या दुर्घटनेत 45 वर्षीय अंजना स्वेन या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती बदंबा-नरसिंगपूरचे आमदार आणि माजी मंत्री देबी प्रसाद मिश्रा यांनी दिली आहे. दरम्यान, दुर्घटनेतील चार गंभीर जखमींना कटक शहरातील एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर जखमींना बडंबा येथील आरोग्य केंद्रात (CHC) दाखल करण्यात आले आहे.
Stampede in Odisha's Cuttak: One dead, several injured at Makar Mela
— ANI Digital (@ani_digital) January 14, 2023
Read @ANI Story | https://t.co/XwWvhpMGji#Odisha #Cuttack #OdishaStampede #Stampede pic.twitter.com/0q0R1jevEU
मुख्यमंत्री पटनायक यांनी व्यक्त केला शोक
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे.
अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी
अठगडचे उपजिल्हाधिकारी हेमंत कुमार स्वेन यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी जत्रेत महिला आणि लहान मुलांसह भाविकांची अचानक वाढ झाली. भगवान सिंहनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर लोक या जत्रेचा आनंद घेण्यासाठी पोहोचले होते. उपजिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले, कटक, खोरधा, पुरी, अंगुल, ढेंकनाल, बौध आणि नयागड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले होते. अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या